जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२४ । सोने आणि चांदी दरात चढ-उतार सुरूच आहे. गेल्या महिन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही धातूंमध्ये वाढ दिसून आली. मात्र अर्थसंकल्पानंतर सोने आणि चांदी दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता. परंतु आता ऑगस्टच्या पहिल्या दिवशी सोने आणि चांदीने महागाईची वर्दी दिली. जळगाव सुवर्णनगरीत मौल्यवान धातूत वाढ झाली. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर भार येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून घसरण होत असलेल्या सोने-चांदीच्या भावात बुधवारी वाढ झाली. यात चांदीमध्ये एक हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ती ८४ हजार रुपये प्रतिकिलोवर, तर सोन्यात ८०० रुपयांची वाढ होऊन ते ७० हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.
केंद्रीय अर्थसंकल्पात सीमा शुल्कात कपात करण्याची घोषणा झाल्यापासून सोने-चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले. यामध्ये सोन्याचे भाव कमी- कमी होत जाऊन ३० जुलैपर्यंत सोने ६९ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर आले होते. त्यानंतर बुधवारी त्यात ८०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे २४ जुलैनंतर सोने पुन्हा एकदा ७० हजार रुपयांवर पोहचले.