जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२४ । देशासह महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला आहे. जून महिन्यात सरासरीही गाठू न शकणार पाऊस आता जुलै महिन्यात चांगला बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दरम्यान, जुलैच्या सुरुवातीलाच जळगावसह महाराष्ट्राच्या विविध भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील 24 तासांमध्ये कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. वारे देखील वाहण्याचा अंदाज आहे.दरम्यान दुसरीकडे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विदर्भात प्रति तास 30-40 किमी वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे.
मुंबईबाबत बोलायचे झाल्यास मुंबईत आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान नुसता पाऊसच होणार नसून या काळात महाराष्ट्रात वादळी वाऱ्याचा इशारा देखील हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किमी इतका राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार दोन जुलै रोजी मान्सूननं संपूर्ण देश व्यापला आहे. त्यामुळे आता पाऊस सर्वदूर हजेरी लावण्याची शक्यता आहे.