⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

धक्कादायक : हिटरचा शॉक लागून अंगावर गरम पाणी पडून चिमुकला ठार

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२१ । जळगाव तालुक्यातील सुजदे येथे हिटरचा शॉक व बादलीतील गरम पाणी अंगावर पडून भाजल्याने ७ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. ओम अनिल सपकाळे (वय ७, रा. सुजदे) असे मृत बालकाचे नाव आहे. दरम्यान, हि घटना घडली तेव्हा आई-वडील घरात नव्हते. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात नोंद केली आहे.

याबाबत असे की, ओमचे वडील अनिल सपकाळे हे सकाळी शेतात गेलेले होते. आई मनिषा सपकाळे यांनी स्नानगृहाजवळ प्लास्टिकच्या बादलीमध्ये पाणी गरम करण्यासाठी हिटर लावलेला होता. सकाळी ७ वाजता नळाला पाणी आले. त्यामुळे त्या घराजवळ पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी ओम हा खेळत असताना त्याचा हात हिटरला लागला. त्यातच बादलीतील गरम पाणी त्याच्या अंगावर पडले. त्यामुळे त्याचे अंग शॉक व गरम पाण्यामुळे भाजले. 

बाहेरुन परत आलेल्या मनिषा यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी आक्रोश केला. त्यांनी हिटरचा वीज प्रवाह बंद केला. नातेवाइकांना बालकाला जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणत असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी राजेश सोनार यांच्या माहितीवरुन तालुका पोलिस ठाण्यात नोंद केली आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे.