प्रवाशांना दिलासा! दिवाळी, छठपूजेसाठी भुसावळमार्गे धावणार 6 विशेष रेल्वे गाड्या
जळगाव लाईव्ह न्यूज । २ सप्टेंबर २०२४ । दिवाळी सणादरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. उभे राहायला देखील रेल्वे गाड्यांमध्ये जागा नसते. रेल्वे प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी मध्य रेल्वेने दिवाळी, छठपूजेसाठी मध्य रेल्वेने भुसावळ विभागामार्फत मुंबई येथून वाराणसी, दानापूर, समस्तीपूर, प्रयागराज, गोरखपूर येथे जाण्यासाठी सहा विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. या गाड्यांच्या ३२ फेऱ्या होतील. यामुळे दिवाळी, छठपूजेच्या काळात प्रवाशांची जागेसाठी होणारी गैरसोय दूर होईल.
भुसावळ विभागातील नाशिक, भुसावळ, खंडवा येथे थांबे आहेत. नियोजनानुसार एलटीटी मुंबई बनारस विशेष गाडीच्या चार फेऱ्या होतील. ही गाडी ३० ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर दरम्यान एलटीटी येथून दुपारी १२.१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी ४.०५ वाजता बनारसला पोहोचेल. तर परतीचा प्रवास ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या काळात बनारस येथून रात्री ८.३० वाजता सुरू होईल. दुसऱ्या दिवशी रात्री ११.५५ वाजता गाडी एलटीटीईला पोहोचेल.
एलटीटी दानापूर गाडीच्या ८ फेऱ्या होतील. २६ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरपर्यंत दर शनिवारी आणि सोमवारी गाडी एलटीटी येथून दुपारी १२.१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजता दानापूरला पोहोचेल. तर २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत रविवार आणि मंगळवारी गाडी दानापूर येथून सायंकाळी ६.१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ११.५५ वाजता एलटीटीला येईल. या गाडीला भुसावळला थांबा असेल
एलटीटी ते समस्तीपुर विशेष गाडी ६ ऑक्टोबरला
एलटीटी – समस्तीपुर गाडीच्या ४ फेऱ्या होतील. ३१ ऑक्टोबर व ७ नोव्हेंबरला दुपारी १२.१५ वाजता एलटीटीहून सुटणारी गाडीदुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता समस्तीपुरला येईल. तर १ व ८ नोव्हेंबरला समस्तीपूर येथून रात्री ११.२० वाजता सुटणारी गाडी तिसऱ्या दिवशी सकाळी ७.४० वाजता एलटीटीला येईल. एलटीटी- प्रयागराज गाडीच्या ४ फेऱ्या होतील. २९ ऑक्टोबर आणि ५ नोव्हेंबरला एलटीटी येथून दुपारी १२.१५ वाजता सुटलेली गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२० वाजता प्रयागराजला पोहोचणार आहे.
पुणे – गोरखपूर विशेष रेल्वे धावणार
पुणे – गोरखपूर गाडीच्या ४ फेऱ्या होतील. २५ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला ही गाडी पुणे येथून दुपारी ४.१५ वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी रात्री ८.४० वाजता गोरखपूरला येईल. परतीचा प्रवास २६ ऑक्टोबर आणि २ नोव्हेंबरला गोरखपूर येथून रात्री ११.२५ वा. सुरू होईल. तिसऱ्या दिवशी सकाळी ६.२५ वाजता पुण्यात येईल.