⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

राहुल गांधींच्या सभेला रावेर क्षेत्रातून 50 बसेस जाणार

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२२ । शेगाव येथे 18 नोव्हेंबर रोजी खासदार राहुल गांधी यांची विराट सभा होत असून त्या संदर्भात सभेची तयारी आणि नियोजन बैठक फैजपूर येथे पार पडली. यावेळी रावेर विधानसभा क्षेत्रातील रावेर-यावल तालुक्यातून जवळपास पन्नास बसेस या सभेला जाणार असल्याची माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी दिली. या बैठकीचे आयोजन फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.

भारत जोडो यात्रेनिमित्त खासदार राहुल गांधी यांच्या शेगांव येथे शुक्रवार, 18 नोव्हेंबर रोजी होणार्‍या विराट सभेनिमित्त जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते जिल्हाभर या सभेची तयारी आणि नियोजन करण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. या पार्श्वभूमीवर फैजपूर येथे ही बैठक घेण्यात आली. रावेर-यावल तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठकीला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देवून शेगाव येथे होणार्‍या राहुल गांधी यांच्या शेगावात 18 नोव्हेंबर रोजी होणार्‍या विराट सभेला सुमारे पन्नास ते साठ बसेसने यावल व रावेर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जाणार असल्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला. सभा झाल्यानंतर शेगांव, भेंडवळ, जळगांव जामोद, निमखेडी या गावांपर्यंत राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत जळगांव जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी सांगितले. आमदार शिरीष चौधरी, काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील यांनीही मनोगत व्यक्त करतांना शेगाव येथील राहुल गांधी यांच्या विराट सभेला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.

यावेळी बैठकीला जिल्हा सरचिटणीस जमील शेख, ज्ञानेश्वर कोळी, यावल तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, राजीव पाटील, डॉ.जगदीश पाटील, लिलाधर चौधरी, डॉ.व्ही.आर.आर.पाटील, शेखर पाटील, नितीन चौधरी, डॉ.जी.पी.पाटील, चंद्रशेखर चौधरी, अमोल भिरुड, अजबराव पाटील, दिलरुबाब तडवी, केतन किरंगे, मानसिंग पवार, महिला काँग्रेसच्या चंद्रकला इंगळे, प्रतिभा मोरे, कांता बोहरा, मीनाक्षी जावरे, भाग्यश्री पाठक, फैजपूर शहर काँग्रेस अध्यक्ष शेख रीयाज, यावल शहराध्यक्ष कदीर खान, फैजपूर युवक काँग्रेस शहराध्यक्ष वसीम तडवी, कलिम मण्यार, जावेद जनाब, गणेश गुरवर ,काँग्रेस आदिवासी सेल यावल तालुकाध्यक्ष बशीर तडवी, रामाराव मोरे, शेखर तायडे, सुरेश खैरनार यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या सर्व फ्रंटलचे अध्यक्ष, नेते पदाधिकारी कार्यकर्ते तसेच रावेर यावल तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य विविध संस्था पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन धनंजय शिरीष चौधरी तर आभार डॉ.जगदीश पाटील यांनी मानले.