⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

पोलिसांच्या वाहनाची कारला धडक, ५ जण जखमी

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२२ । अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशातच ओव्हरटेच्या नादात पोलिस वाहनाने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले. यातील दाेन जणांना गंभीर दुखापत झाली आहे. हा अपघात सोमवारी महामार्गावरील खेडी पेट्रोल पंपाजवळ झाला.

अपघातात कारचालक विशाल दिलीप बडगुजर (वय ३४), दिलीप उखा बडगुजर (वय ६३), नेहा अरविंद बडगुजर (वय ३५), दुर्गेश अरविंद बडगुजर (वय १०) व कार्तिक अरविंद बडगुजर (वय ८, सर्व रा. भगवती इंजिनिअरिंग वर्क्स, फैजपूर, ता. यावल) हे जखमी झाले आहेत. यात विशाल व दिलीप बडगुजर यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली असून, विशालच्या डाेळ्याजवळील हाड फ्रॅक्चर झाले आहे. तर तिघांना किरकाेळ दुखापत झाली आहे.

घटना अशी की, फैजपूर येथील भगवती इंजिनिअरिंग वर्कशाॅपचे मालक दिलीप बडगुजर व कुटंुबीय सोमवारी सकाळी फैजपूर येथून कारने (क्रमांक एमएच-१९, एपी-१८३२) जळगाव येथे मुलीकडे येण्यासाठी निघाले होते. खेडी पेट्रोल पंपाजवळ समाेरून (जळगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या) येणाऱ्या पोलिसांच्या वाहनाने (क्रमाक्र एमएच १९ यू ९२२०) त्यांच्या कारला जाेरदार धडक दिली. या वेळी जाेरात आवाज हाेऊन कारचा पुढील भाग चक्काचूर झाला. अपघातात गाडी चालवणारा विशाल व त्याचे वडील दिलीप बडगुजर हे केबिनमध्ये अडकून पडले.

या वेळी परिसरातील नागरिकांनी धावपळ करून त्यांना बाहेर काढून क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला केली. त्यानंतर नागरिकांनी जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या ठिकाणी प्राथ‌मिक उपचार केल्यानंतर दुपारी १.३० वाजेच्या सुमारास सुरुवातीला जळगावातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर फैजूपर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.