जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२५ । भुसावळ, जळगावमधील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. उन्हाळी हंगामात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्यांच्या ४९८ फेऱ्या करण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश गाड्या भुसावळ मार्गे धावणार असल्याने प्रवाशांची सोय होणार आहे.

यासह, भारतीय रेल्वेने एकूण ८५४ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे, यात २७८ अनारक्षित रेल्वे गाड्यांचाही समावेश आहे. यामुळे प्रवाशांना जनरल तिकीट काढून या गाड्यांनी प्रवास करता येणार आहे.
एलटीटी येथून दानापूर, मऊ आणि बनारससाठी विशेष गाड्या चालवणार आहेत. एलटीटी- दानापूर द्वि-साप्ताहिक विशेष गाडी ७ एप्रिल ते ३० जून दरम्यान दर सोमवार आणि शनिवारी दुपारी १२.१५ वाजता सुटेल. परतीची गाडी दानापूर येथून ८ एप्रिल ते १ जुलै कालावधीत दर मंगळवार आणि रविवारी रात्री ७ वाजता सुटेल. एलटीटी – मऊ द्वि-साप्ताहिक विशेष गाडी ६ एप्रिल ते २९ जून या कालावधीत दर शुक्रवार आणि रविवारी दुपारी १२.१५ वाजता सुटेल. मऊ येथून ८ एप्रिल ते १ जुलै या कालावधीत दर रविवार आणि मंगळवारी पहाटे ५५० वाजता परतीचा प्रवास सुरू होईल.
एलटीटी बनारस द्वि-साप्ताहिक विशेष गाडी ९ एप्रिल ते २६ जून या कालावधीत दर बुधवार आणि गुरुवारी दुपारी १२.१५ वाजता सुटेल. बनारस येथून १० एप्रिल ते २७ जून या कालावधीत दर गुरुवार आणि शुक्रवारी रात्री ८.३० वाजता सुटेल. पुणे- दानापूर द्वि-साप्ताहिक विशेष गाडी ७ एप्रिल ते ३० जून या कालावधीत दर सोमवार आणि शुक्रवारी रात्री ७.५५ वाजता पुणे येथून सुटेल. दानापूर येथून ९ एप्रिल ते २ जुलै या कालावधीत दर बुधवार आणि रविवारी सकाळी ८.३० ला सुटेल. प्रवाशांनी या गाड्यांचे आरक्षण करूनच प्रवास करावा असे आवाहन प्रशासनाने केले.