जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२५ । राज्यात एकीकडे रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांनी बनावट जन्मदाखल्यांच्या आधारे नागरिकत्व मिळवल्याचे प्रकार समोर आले असताना यातच जळगाव महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागातून अनागोंदी कारभार समोर आला आहे.

मनपाच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात तब्बल ४३ प्रकरणांवर तहसीलदारांच्या बनावट सह्या आढळून आल्या आहेत. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या संपूर्ण गैरव्यवहाराच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असून, महापालिका आणि तहसीलदार कार्यालय स्वतंत्रपणे गुन्हे दाखल करणार आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
फेब्रुवारी महिन्यात अवघ्या दहा ते बारा दिवसांत ५० प्रकरणे दाखल झाली होती, त्यातील ४९ जन्मदाखले आणि १ मृत्यू दाखला होता. मात्र, कर्मचारी तपासणी करत असताना तहसीलदारांच्या सहीबाबत शंका निर्माण झाली. चौकशीदरम्यान, फक्त 7 दाखल्यांवर खऱ्या सह्या असल्याचे स्पष्ट झाले, तर उर्वरित 43 दाखल्यांवर बनावट सह्या आढळल्या. त्यामुळे हा मोठा गैरव्यवहार समोर आला आहे. या गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर, जळगाव महापालिकेने संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तसेच, तहसीलदार कार्यालयाकडून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.