जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२५ । महाराष्ट्रात सध्या २९ महापालिका निवडणुकींची धामधूम सुरू असून अशातच आज पार पडलेल्या राज्य सरकारच्या कॅबिनेटने ४ महत्वाचे निर्णय घेतले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारणी ते २९१ आरोग्य सेविकांच्या नियुक्त्यांचा निर्णय या बैठकीत घेण्यात आले.

तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व मिळणार, तसेच मताचाही अधिकार आहे.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
- ग्राम, तालुका व जिल्हा प्रशासन सक्षम करण्यासाठी जिल्हा कर्मयोगी २.० व सरपंच संवाद कार्यक्रम राबविणार (सामान्य प्रशासन विभाग)
- राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत आरोग्य विभागामध्ये कार्यरत व सेवानिवृत्त झालेल्या बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित होणार. (ग्रामविकास व पंचायत राज विभाग)
- धाराशिव शहरात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी दुग्धव्यवसाय विकास विभागाची एक एकर जागा. (महसूल विभाग)
- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा करणार. नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व मिळणार. मताचाही अधिकार. अधिनियमातील सुधारणेसाठी अध्यादेश काढणार. (नगर विकास विभाग)












