जळगाव लाईव्ह न्यूज । २२ नोव्हेंबर २०२१ । केंद्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२०-२१ अंतर्गत एरंडोल नगरपालिकेला ‘कचरामुक्त शहर’ या घटकांमध्ये ३ स्टार मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे २० नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात भारत सरकारचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा व सहसचिव रूपा मिश्रा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन नगरपालिकेचा गौरव करण्यात आला. यावेळी तत्कालीन मुख्याधिकारी तथा सध्याचे जिल्हा प्रशासन अधिकारी किरण देशमुख, मुख्याधिकारी विकास नवाडे, कार्यालय अधीक्षक हितेश जोगी, आरोग्य निरीक्षक अनिल महाजन, मुकादम आनंद दाभाडे आदी उपस्थित होते, अशी माहिती नगरपालिकेचे अध्यक्ष रमेशसिंग परदेशी व मुख्याधिकारी विकास नवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की, वेस्ट झोनमध्ये ३०४ नगरपालिकांनी सहभाग नोंदविला होता. त्यात एरंडोल नगरपालिकेने पहिल्या पन्नासमध्ये येण्याचा बहुमान मिळवला आहे. विभागस्तर तसेच जिल्हास्तरावर एरंडोल नगरपालिका प्रथम तर राज्यस्तरावर पहिल्या दहामध्ये येण्याची शक्यता आहे. या सर्वेक्षणामध्ये एरंडोल नगरपालिकेने पाच घंटागाड्याद्वारे घरोघरी जाऊन ओला-सुका घरगुती घातक कचरा व प्लास्टिक अशाप्रकारे कचऱ्याचे जागेवरच वर्गीकरण करून संकलन केले आहे व अजूनही ते करीत आहे. यामध्ये एरंडोल नगरपालिकेने प्लास्टिक गोळा व जप्त करून एरंडोल शहरात प्लास्टिक मुक्त देखील करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
शहरातील नागरिकांकडून यापूर्वी अवाजवी चार टक्के विकासकराची आकारणी करण्यात आली, आता या विकासकराच्या दरात १ टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने बर्याच नागरिकांचे रोजगार व उद्योगधंद्यांमध्ये घट झाल्याने या वर्षी होणारी वार्षिक कर आकारणी सध्यास्थितीत स्थगित ठेवण्यात आलेली आहे. वाढीव कर आकारणी करण्यात आलेली नाही. ‘माझी वसुंधरा अभियाना’अंतर्गत ज्या नागरिकांनी रेन वाटर हार्वेस्टिंग, सोलर इलेक्ट्रिक सिस्टीम, होम कम्पोस्टिंग किंवा आपल्या स्वमालकीच्या जागेत किमान पाच वृक्ष लावून त्यांचे संगोपन केले असेल अशा नागरिकांना एकत्रित मालमत्ता करातून एक टक्के सूट व ज्या इमारतीस शासनमान्य अभिकरना करून हरित इमारत म्हणून घोषित करण्यात आली असेल त्यांना एकत्रित मालमत्ता करातून पाच टक्के सूट देण्याचा ठराव नगरपालिकेने पारित केला आहे. याबाबतची अंमलबजावणी २०२२-२३ संबंधित पात्र लाभार्थ्यांसाठी करण्यात येणार आहे. एरंडोल नगरपालिकेतर्फे नर्सरी तयार करण्यात येत असून जे नागरिक वृक्षसंवर्धनाकरीता इच्छुक असतील अशा नागरिकांना रोपांचे देखील वाटप करण्यात येणार आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी यांनी यावेळी केले.