शुक्रवार, सप्टेंबर 15, 2023

ट्रान्सपोर्टमधून २५ गोणी बंदी असलेले प्लास्टिक जप्त

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑगस्ट २०२३ । चाळीसगाव शहरात पालिकेच्या पथकाने ट्रान्सपोर्टमधून २५ गोणी बंदी असलेले प्लास्टिक जप्त केले. याप्रकरणी संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली. यापुढे थेट गुन्हेच दाखल करण्यात येणार असल्याची माहीती मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांनी िदली.

शहरात प्लास्टिक बंदी मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक गठीत करण्यात आले असून पथक प्रमुख दिनेश जाधव, प्रेमसिंग राजपूत, सुमीत सोनवणे, नितीन सूर्यवंशी यांच्या पथकाने १३ रोजी दुपारी ट्रान्सपोर्टची तपासणी केली असता हिरापूर रोडवरील एमएच.३५ आर.४१७६ या ट्रकमध्ये बंदी असलेले २५ गोणी प्लास्टिक आढळून आले. हे प्लास्टिक जप्त करून याच्याशी संबंधीत असलेले झुलेलाल प्लास्टीक, अरिहंत प्लास्टीक, राजू वाणी प्लास्टीक, जय भोले प्लास्टीक, मनुमाता प्लास्टिक अशांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येणार आहे, असे मुख्याधिकारी ठोंबरे यांनी सांगितले.

शहरात प्लास्टिक बंदी मोहीम सुरूच राहणार असून यापुढे बंदी असलेले प्लास्टिक आढळून आल्यास थेट गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाणार असल्याचे पालिकेने सांगितले. चाळीसगाव येथे प्लास्टिक बंदीची कारवाई करताना पथकातील अधिकारी.