चोपड्यात पोलिसांची ऐतिहासिक कारवाई; तब्बल १,७०० ब्रास अवैध वाळू जप्त!

मे 28, 2026 5:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू माफियांनी धुमाकूळ घातला आहे. नुकतीच अमळनेर तालुक्यात झालेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले असून यानंतर आता जळगाव पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. चोपडा तालुक्यातील निमगव्हाण येथे दादाजी धुनीवाले मंदिराजवळ बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेली तब्बल १ हजार ७०० ब्रास वाळू पोलिसांनी जप्त केली असून, या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

valucs

चोपडा तालुक्यातील निमगव्हाण गावातील दादाजी धुनीवाले मंदिराच्या परिसरात वाळूचा एक खूप मोठा साठा करून ठेवण्यात आल्याची खात्रीशीर गुप्त माहिती जळगाव पोलिसांना मिळाली होती. माहितीचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने सूत्रे हलवली. त्यांनी तात्काळ चोपड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना विशेष पथकासह घटनास्थळी रवाना होण्याचे आदेश दिले.

प्रकरणाचे गांभीर्य मोठे असल्याने पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना दिली आणि महसूल विभागालाही या मोहिमेत सामील करून घेतले. पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या संयुक्त पथकाने तातडीने घटनास्थळी धाड टाकत हा अवाढव्य वाळू साठा आपल्या ताब्यात घेतला. सध्या हा साठा जप्त करण्याची कायदेशीर प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे.

जप्त करण्यात आलेली १ हजार ७०० ब्रास वाळू ही जळगाव जिल्ह्याच्या इतिहासातील आजवरच्या सर्वात मोठ्या साठ्यांपैकी एक मानली जात आहे. बाजारात या वाळूची किंमत लाखोंच्या घरात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली आणि अचूक नियोजनाखाली ही कामगिरी पार पडली. अवैध वाळू व्यवसायाविरोधात पोलिसांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले असून, नागरिकांकडून या धडक कारवाईचे स्वागत केले जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now