जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२२ । देशात आधीच महागाईने डोकंवर काढले आहे. मागील काही काळात सर्वच गोष्टी महागल्या आहे. महागाईतून दिलासा कधी मिळणार याची देशवासीय वाट पाहत आहे. मात्र अशातच आता रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना मोठा झटका बसला आहे. तुम्हीही ट्रेनने प्रवास करणार असाल तर आता तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील. रेल्वेने अनेक गाड्यांचे भाडे वाढवले आहे. देशभरात धावणाऱ्या 130 मेल एक्स्प्रेसचे भाडे वाढवण्यात येत असल्याचे रेल्वे विभागाने सांगितले आहे.

भाडे का वाढवले ?
या गाड्यांना सुपरफास्टच्या श्रेणीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे गाड्यांचे भाडे वाढवले जात आहे. रेल्वेने एसी-1 आणि एक्झिक्युटिव्ह क्लासच्या ट्रेनमध्ये प्रति प्रवासी 75 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय AC-2-3, चेअर कारमध्ये 45 रुपये आणि स्लीपर क्लासमध्ये 30 रुपये भाडे वाढवण्यात आलं आहे. त्यामुळे तुम्हाला आतापासून जास्त पैसे खर्च करावे लागतील.

अजून किती खर्च येईल?
रेल्वेने सांगितले की, वाढलेले भाडे १ ऑक्टोबरपासून लागू झाले आहे. आतापासून प्रवाशांना AC-1 मध्ये PNR बुक करण्यासाठी 450 रुपये अधिक खर्च करावे लागतील. त्याच वेळी, एसी-2 आणि 3 मध्ये 270 रुपये आणि स्लीपरमध्ये 180 रुपये अतिरिक्त भरावे लागतील.
सुपरफास्ट ट्रेनचा वेग किती?
या गाड्यांमधील भोजन किंवा प्रवाशांच्या सुरक्षेच्या कोणत्याही सुविधांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, सरासरी ५६ किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या गाड्यांना वेळापत्रकात सुपरफास्टचा दर्जा देण्यात आला आहे. रेल्वेच्या प्रीमियम राजधानी, शताब्दी, दुरांतो गाड्यांचा सरासरी वेग 70-85 किमी प्रतितास आहे.
अनेक गाड्यांना मेल एक्स्प्रेसची स्थिती
रेल्वेने नुकतेच एक नवीन वेळापत्रक जारी केले आहे, ज्या अंतर्गत अनेक गाड्यांना मेल एक्सप्रेसचा दर्जा देण्यात आला आहे. सुपरफास्ट झाल्यानंतर या गाड्यांमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करू शकणार नाहीत.












