Jalgaon : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला 10 वर्षांची शिक्षा
जळगाव लाईव्ह न्यूज । अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तरुणाला न्या. एस. आर. भांगडिया-झवर यांनी १० वर्षांची सक्त मजुरी व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. अरुण भगवान गवळी (रा. गुम्मी, जि. बुलढाणा) असं शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे.
शिरपूर तालुक्यातील १४ वर्षीय मुलगी पाचोरा तालुक्यात तिच्या आजोबांकडे शिक्षणासाठी राहत होती. इयत्ता नववीमध्ये असताना २४ डिसेंबर २०१६ रोजी शाळेची वेळ संपल्यावरही ती घरी आली नव्हती. त्यामुळे तिच्या आजोबांनी तक्रार दिली होती. याचा तपास सुरू असताना याच दिवशी अरुण भगवान गवळी याने तिला रेल्वेने जळगाव येथे बोलावले व तिला घेवून त्याच्या बहीणीकडे गेला होता. रात्रभर तेथे थांबल्यानंतर गवळी याने मुलीला त्याच्या गावी व नंतर छत्रपती संभाजीनगर येथे घेवून गेला. तेथे मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत वारंवार तिच्याशी शारिरीक संबंध केले, त्यामुळे मुलगी गर्भवती झाली.
मारण्याच्या भीतीने पोलिसात हजर
मुलगी गर्भवती राहिल्याविषयी गवळी याने या मुलीच्या आईला कळविले. त्यानंतर आई व इतर जण मुलीला घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे जात असतानाच ते आपल्याला मारतील या भितीने गवळी हा मुलीसह बेगमपुरा पोलिस ठाण्यात हजर झाला. तेथून पाचोरा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान मुलगी सहा आठवड्याची गर्भवती असल्याचे समोर आले. तसा वैद्यकीय पुरावा न्यायालयासमोर सादर करण्यात आला.
डॉ. प्रवीण ठाकरे यांच्यासह पीडितेची मैत्रीण, पीडितेची मामी यांच्या साक्ष महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकारपक्षातर्फे १० साक्षीदार तपासण्यात आले. युक्तिवाद पूर्ण होऊन न्या. एस. आर. भांगडिया- झवर यांनी अरुण गवळी यास भादंवि कलम ३७६ नुसार १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व २० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास, भादंवि कलम ३६३ नुसार दोन वर्षे सक्त मजुरी, एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास आठ दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले.