जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२२ । वरणगावला तालुक्याचा दर्जा मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, महसूल मंत्री विखे पाटील, आमदार संजय सावकारे यांची भेट घेऊन भाजपाच्या वतीने माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी मुंबईत केली.
वरणगाव हा ब्रिटिश राजवटीत तालुका होता फक्त वरणगाव व बोदवडला बाजार पेठ होती तसेच राज्यात गुरांचा मोठा बाजार मंगळवारी आजही येथे भरतो. सरकारने कालांतराने वरणगाव ऐवजी भुसावळ तालुका करून वरणगाववर अन्याय केला. अनेक महसूली कामे करण्यासाठी 20 किलोमीटर अंतराचा फेरा मारावा लागतो. वरणगाव शहराला लागून 29 खेडे लागून असून जवळच दीपनगर वीज निर्मिती केंद्र, हतनूर धरण, वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी आहे.
शेजारी बोडवड तालुका, मुक्ताईनगर, रावेर तालुका लागून आहे. शेतकर्यांना व सर्व सामान्य जनतेला महसूलच्या दिवाणी न्यायालयाच्या व शेतकी संघाच्या इतर शासकीय कामांसाठी 20 किमी फेर्याने जावे लागत असल्याने भरपूर अडचणी येतात. राज्य सरकारने वरणगावला तालुक्याचा दर्जा दिल्यास गैरसोयी टळतील, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली.