⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

युद्धाचा फटका : स्वयंपाकघराला बसणार झळ, तेलाच्या किमती २५-३० रुपयांनी वाढल्या

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मार्च २०२२ । रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाची झळ आता आपल्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचणार आहे. तेलाच्या (kitchen oil) किमती २५ ते ३० रुपयांनी वाढल्यानं सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडू लागला आहे. युद्ध थांबले तरीही परिस्थिती सामान्य होण्यास पुढील दीड ते दोन महिने लागतील असा अंदाज व्यक्त होतोय. दरम्यान, जळगावात एकाच दिवसात तेलाच्या पाऊचच्या किंमतीत ८ रुपयाची वाढ झाली आहे.

आठवडाभरापूर्वी ९०० एमएल तेलाचे पाऊच १३२ रुपयांना घाऊक बाजारात मिळायचे. त्यात २८ रुपयांची वाढ झाली. आठवडाभरातील ही दुसरी वाढ आहे. मंगळवारी ८ रुपयाने तेलाचे पाऊच महागले.

आठवड्यापूर्वी ९०० एमएल पाऊच १३२ रुपये हाेते. ते मंगळवारी १६० रुपयांवर पाेहाेचले आहे. युक्रेनमधून भारताला सूर्यफुलाची आवक हाेते. युद्धामुळे ती बंद झाल्याने ही दरवाढ झाली आहे. जाेपर्यंत युद्धाचे सावट दूर हाेत नाही, ताेपर्यंत तेलाचे भाव चढते राहण्याचा अंदाज आहे.

असे आहेत खाद्यतेलाचे दर
खाद्यतेलात सर्वात महाग शेंगदाणा तेल १६० रुपये किलाे हाेते. त्या खालाेखाल सूर्यफूल तर सर्वात स्वस्त साेयाबीन तेल हाेते; परंतु गेल्या आठवड्यात हे चित्र बदलून साेयाबीन १३२ वरून १६०, सूर्यफूल १४० वरून १५० रुपये तर शेंगदाणा तेल १४० वरून १६० वर पाेहाेचले आहे.

पेट्रोल डिझेल दरवाढीचाही भडका उडण्याची शक्यता

येत्या काही दिवसात युद्ध थांबले तरीही परिस्थिती सामान्य होण्यास त्यापुढे दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे, त्यातच देशात पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त होत असल्यानं तेला बरोबरच इतरही वस्तूंच्या दरवाढीला  तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे सरकार काय पावलं उचलणार? याकडं लक्ष लागलंय.