⁠ 
बुधवार, एप्रिल 17, 2024

मुलीच्या परदेशी वारीचे स्वप्न अपूर्णच राहिले, ‘त्या’ मातेने घेतला जगाचा निरोप

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ डिसेंबर २०२१ । गुरुवारी झालेल्या भीषण अपघात जखमी झालेल्या रेखा हेमंत नाईक (४३, रा. रावेर) यांचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. यामुळे पिंपरुड अपघातातील मृतांची संख्या दोन झाली आहे. मृतांमध्ये दोन्ही महिला आहेत. रेखा यांची मुलगी पदव्युत्तर शिक्षणासाठी परदेशात जाणार होती. तिच्या पासपोर्टच्या कामासाठी त्या भुसावळला येत असताना रावेर सावदा ते पिंपरूड दरम्यान, हा अपघात झाला.

मुलीच्या परदेशवारीचे स्वप्न उराशी असलेल्या मातेचा मृत्यू झाला. पिंपरुडनजीक गुरुवारी सकाळी झालेल्या दोन कारच्या अपघातात भावना भरत सुपे (४०, रा. वाघोदा बुद्रुक, ता. रावेर) ह्या जागीच ठार झाल्या होत्या, अन्य पाच जण जखमी झाले होते. जखमींमध्ये रेखा नाईक यांचाही समावेश होता. रावेर येथील व्ही. एस. नाईक महाविद्यालयाचे चेअरमन हेमंत नाईक यांची मुलगी प्रियंका (२०) ही पुणे येथे बीसीएचे शिक्षण घेत आहे. भविष्यात परदेशात जाण्याचे ध्येय उराशी ठेवून त्यांच्या आई रेखा या मुलीचा पासपोर्ट काढण्यासाठी भुसावळ डाक कार्यालयात त्यांचा मुलगा प्रतिसह भुसावळला टपाल कार्यालयात येत होत्या. त्याचवेळी त्यांना अपघातात मृत्यूने गाठले.

जळगावी उपचार

रेखा यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन झाल्यानंतर रविवारी रावेर येथील रामटेक वैकुंठधामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील माहेर त्यांचे माहेर होते. त्यांच्या पश्चात पती, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.