⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

बंडखोरांचे आरोप म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ : उपमहापौर कुलभूषण पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२१ । शिवसेनेतून पुन्हा भाजपमध्ये परतलेल्या बंडखोर नगरसेवकांनी उपमहापौर निधी देत नसल्याचा आरोप केला आहे. गेल्या ६ महिन्यात सेनेची सत्ता आल्यापासून त्या नगरसेवकांच्या प्रभागात करोडोंची कामे मंजूर करण्यात आली असल्याने ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असेच म्हणावे लागेल, असा टोमणा उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी लगावला आहे.

उपमहापौर कुलभूषण पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले की, प्रभाग क्रमांक तीनमध्ये काही दिवसांपूर्वीच जवळपास चार कोटींची कामे मंजूर करण्यात आली आहे. त्यात आत्ताच मंजूर केलेल्या दोन कोटींच्या कामांचा देखील समावेश आहे. तसेच प्रभाग क्रमांक आठमध्ये गेल्या चार-पाच महिन्यात जवळपास पावणे दोन कोटींची कामे मंजूर करण्यात आलेली आहेत. आज भाजपमध्ये परतलेल्या नगरसेवकांपैकी अनेकांच्या प्रभागात कमी-अधिक प्रमाणात कामे सुरू आहेत. भारतीय जनता पक्षाकडून गेल्या अडीच वर्षात जेवढा निधी त्यांना मिळाला नसेल त्यापेक्षा कितीतरी अधिक पट निधी देण्याचा प्रयत्न आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून केलेला आहे. निधी मिळत असतानाही त्यांच्याकडून आरोप करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असाच प्रकार असल्याचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी सांगितले.