⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

तीन कोटी पाण्यात : नुकत्याच झालेल्या रस्त्याचे झाले तीनतेरा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२२ । कासोदा-येथून तळई मार्गे उत्राण हा रस्ता सुमारे तीन महिन्यांपूर्वी तीन कोटी रुपये खर्चून करण्यात आला होता, परंतू आज या रस्त्याची अत्यंत दूर्दशा झालेली आहे, संबंधित अधिकार्यांनी याबाबत तक्रारी असतांना देखील ठेकेदाराला बीलं काढून दिल्याचा गावकऱ्यांचा आक्षेप आहे. कागदावर ठेकेदार वेगळा व प्रत्यक्ष काम करणारा वेगळा असल्याचा देखिल आरोप होत आहे.

शासनाचा हा पैसा केवळ अधिकार्यांनी ठेकेदाराशी संगमत केल्यामुळे वाया गेला आहे, या रस्त्याशी संबधीत अधिकार्यांची कसून चौकशी व्हावी, संबंधित ठेकेदारावर कारवाई होवून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न शासनदरबारी मांडावा व हा रस्ता वापरण्यायोग्य करुन देण्यात यावा. अशी मागणी संतप्त नागरिकांकडून होत आहे.

कासोदा ते तळई या रस्त्यावर रु. १,२६,६७८३०/- तर तळई उत्राण या रस्त्यावर १,४८,९५०००/- एवढी रक्कम खर्च झाली आहे. याबाबत अंतूर्ली, तळई व उत्राण येथील ११५ नागरीकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधितांकडे लेखी तक्रार केली आहे. माहितीच्या अधिकारात माहिती मागीतली आहे, येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांना हे काम अत्यंत निकृष्ट झाले आहे. हे कळते आहे. पण संबंधित अधिकाऱ्यांना हे काम अत्यंत उत्कृष्ट दिसल्यामुळे त्यांनी ठेकेदारावर मेहेरनजर दाखवून त्याचे बीलं काढून दिल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.