जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२२ । अमळनेर तालुक्यातील ढेकू व पिंपळे रोड परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाने सतर्क होऊन डेंग्यू सदृश्य आजारांना रोखण्यासाठी या भागात नियमित कीटकनाशक फवारणी करण्यात यावी अशी मागणी राजमुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा आरोग्य सभापती शाम पाटील यांनी पालिका प्रशासनाकडे पत्राद्वारे केली आहे.
परिसरातील खुल्या भूखंडांवर पावसाळ्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचे डबके साचलेले असल्याने त्या ठिकाणी डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत असते. २ दिवसांपूर्वी डेंग्यूमुळे विद्यानगर येथील तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या भागातील लहान मुले , जेष्ठ नागरिक – महिला यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून या भागात पालिकेतर्फे नियमित कीटकनाशक फवारणी करण्यात यावी, अशी मागणी शाम पाटील यांनी मुख्याधिकारी यांना पत्राद्वारे केली आहे.