जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२२ । भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची निर्मिती करताना प्रत्येक घटकाला न्याय दिला, असे प्रतिपादन ए.एस.बिऱ्हाडे यांनी केले.
पारोळा येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने, महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व भारतीय संविधान या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. आर. पाटील होते. प्रमुख वक्ते ए.एस.बिऱ्हाडे होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. सदर प्रसंगी संविधानामुळे भारतीय नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समानता हक्क मिळत असून आपण यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. जगात भारत देश बलशाली देश असून संविधानाच्या आधारे भारतातील लोकशाहीच्या स्वरूपात व्यापक बदल होत आहेत. सामाजिक न्याय व समता प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतांना दिसत आहेत, असे बिऱ्हाडे यांनी सांगितले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.डी.आर.पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती दिली. या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ.एस.बी.भावसार, प्रा.जे.बी.पाटील, डॉ.एस. एन.साळुंखे, डॉ.आर.बी. नेरकर, डॉ.डि.एच.राठोड, डॉ.एस.बी.सावंत उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. एस. व्ही. चव्हाण यांनी केले.
तसेच प्रमुख वक्ते बिऱ्हाडे यांनी महात्मा फुले यांच्या स्री शिक्षण विषयक कार्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अगदी बारकाईने अभ्यास करून प्रचंड मेहनतीने भारताचे संविधान तयार केले. लोकशाहीत संविधानाचे महत्व असल्याने सर्व नागरिकांना लाभ होतांना दिसून येतो, असे ते म्हणाले.