⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

जिल्हा दुध संघाच्या वार्षिक सभेत आमदार संचालकांनीच पाठ फिरवली!

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२२ । सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारने काही दिसवांपूर्वी जिल्हा दूध संघावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत संचालक मंडळ बरखास्त केले होते. दि.२७ रोजी सकाळी ११.०० वाजता झालेल्या संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकडे मात्र या पक्षांच्या आमदार संचालकांनीच पाठ फिरवली. त्यामुळे कोणतेही वाद न होता सभा सुरळीत पार पडली. विशेष म्हणजे या सभेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या आ. एकनाथराव खडसे यांनीच सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ते दूध संघाचे संचालक देखील नाहीत हे महत्वाचे. यावेळी सभेत संघाच्या ४८१ संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

संघाने मागील वार्षिक अहवाल वर्षात ४७२ कोटीची उलाढाल झालेली आहे व संघाने २ कोटींच्या वर नफा कमविलेला आहे. यावेळीस सभासद संस्थांना त्यांनी पुरविलेल्या चांगल्या दुधावर ०.३० पैसे प्रतिलिटर भावफरक सुध्दा जाहीर करण्यात आला. विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ ऑगस्ट, २०२० मध्ये संपलेला होता. परंतु कोरोनामुळे निवडणूक (इलेक्शन) पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. मागील ७ वर्षात मंदाताई खडसे यांच्या नेतृत्वात संघाच्या प्रगतीचा आलेख चढता आहे. संघाने मागील वर्षात सरासरी प्रतिदिन २.३७ हजार किलो दुध खरेदी केले व सरासरी १.९१ हजार लिटर प्रतिदिन विक्री केले व उर्वरीत दुधाचे दुग्धपदार्थ बनवुन विक्री केलेले आहे.

अहवाल वर्षात संघाने २१ हजार मे.टन पशुखाद्य विक्री केलेले आहे. याशिवाय तुप, श्रीखंड, टेबल बटर, दही, ताक, दुध पावडर, बटर इ. विक्री केलेली आहे. संघाकडून दुध उत्पादकांना दुधाळ जनावरे खरेदी करण्यासाठी, कृत्रिम रेतन, वैरण विकास, रोगप्रतिबंधक याकरीता सेवा उपलब्ध करुन दिल्या जातात. सभेत मागील साधारण सभेचे प्रोसिडींग वाचुन कायम करण्यात आले. तसेच मागील वर्षाचे (२०२१-२२) आर्थिक पत्रकांना मंजुरी देण्यात आली. सभेमध्ये विषयावर कार्यकारी संचालक श्री. मनोज लिमये हयांनी सभागृहाची मंजूरी घेतली. संघास सतत ऑडीट वर्ग “अ” मिळत आलेला आहे. सभासदांनी त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी सभागृहात मांडण्यात आल्या. सभागृहाने संचालक मंडळाचे मागील ७ वर्षाच्या कामकाजाचे अभिनंदन केले. म. चेअरमन यांनी त्यांच्या भाषणात संघाने दिलेल्या म्हैस दुधास रु.४६.७२ पैसे प्रति लिटर व गायीच्या दुधास रु.२८.४१ पैसे भाव प्रति लिटर असे सांगण्यात आले. तसेच पुढील वर्षी उत्पादकांना दुधाचे पेमेंट बँकेत न जाता बँकेव्दारा त्यांच्या संस्थेमध्येच केले जाईल. अशी व्यवस्था करण्याचे नियोजन आहे असे कळविले.

एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या भाषणात संघाचे कामकाज पारदर्शी आहे व त्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार नाही याचे समाधान व्यक्त केले. तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत संघाने केलेली ७२ कोटीची गुंतवणूक संघाच्या पुढील ५० वर्षापर्यंत कामास येईल तसेच संघाने जीपीएस, सी.सी.टी.व्ही. व अन्य नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करुन उत्पादकांना चांगली सेवा कशी देता येईल हयाकडे लक्ष द्यावे अशा सुचना केल्या.

प्रमुख अतिथी,आ. एकनाथराव खडसे, हयाशिवाय संचालक मंडळाचे चेअरमन मंदाकिनीताई एकनाथराव खडसे, तसेच संचालक मंडळ सदस्य ऍड.वसंतराव मोरे, डॉ.संजीव कृष्णराव पाटील, हेमराज खुशाल चौधरी, जगदीश लहू बढे, प्रमोद पांडूरंग पाटील, अशोक दगडू चौधरी, सुभाष जगन्नाथ टोके, अशोक प्रल्हाद पाटील, प्रल्हाद नारायण पाटील, शामलताई अतूल झांबरे, सुनिताताई राजेंद्र पाटील, डॉ.पुनमताई प्रशांत पाटील संचालक सदस्य उपस्थित होते.