आनंदाची बातमी : शेळगाव प्रकल्पात होणार ४.११ टीएमसी पाणीसाठा
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२२ । यावल आणि जळगाव तालुक्यातील अनेक गावांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या शेळगाव बॅरेजचे काम आता जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे शासन नियमानुसार या मध्यम प्रकल्पात ७५ टक्के म्हणजे जवळपास ३ टीएमसी पाणीसाठा केला जाऊ शकतो.या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ४.११ टीएमसी आहे. त्याच्या ७५ टक्के म्हणजे जवळपास ३ टीएमसी पाणी या वर्षी धरणात साठवले जाणार आहे. यासाठी आज धरण सुरक्षा मंडळ नाशिक येथील अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, मंडळाचे कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांनी प्रकल्प स्थळावर येऊन सर्व आवश्यक तपासणी आणि पाहणी केली.
यावेळी प्रकल्पाचे सल्लागार पी. आर. पाटील, पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता यशवंत भदाणे, कार्यकारी अभियंता आणि इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रकल्पाची पाहणी केली. तसेच गेट व्यवस्थित कार्यरत आहेत की नाही याची पाहणी केली. याशिवाय पाणीसाठा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेही ना हरकत प्रमाणपत्र लागणार आहे. ते मिळाल्यानंतर पाणीसाठा करणे शक्य होणार आहे.
शेळगाव प्रकल्प हा जळगाव शहरापासून १८ किमीवर असलेल्या शेळगाव गावाजवळ आहे. या प्रकल्पाला १९९७-९८ मध्ये सुरुवात करण्यात आली. त्यानंतर हा प्रकल्प आता पूर्णत्वाला आला होता. यावल तालुक्यात डार्क झोनमध्ये असणाऱ्या ९१२८ हेक्टर शेतजमिनीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. जळगाव व भुसावळ येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, खासगी औद्योगिक वसाहती, खासगी उद्योग समूहासाठी आवश्यक औद्योगिक वापरासाठी मुबलक पाणी व पुढील ५० वर्षांसाठी आवश्यक पाण्याचे नियोजनानुसार आवश्यक मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. भुसावळ शहर पाणीपुरवठ्यासाठी शाश्वत स्रोत आणि मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच भुसावळ रेल्वे जंक्शन आणि इतर रेल्वे वसाहतींसाठीही पाणी उपलब्ध होणार आहे.