आता ‘ही’ वीट डोक्यात हाणणार, उद्धव ठाकरेंनी नेमका कोणाला दिला इशारा
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२२ । आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी शिंदे गटासोबत गेलेल्या आमदारांचा उल्लेख बंडखोर असा करत निशाणा साधला. तुम्हाला आमदार घेऊन जायचे आहेत घेऊन जा…आणखी कुणाला जायचं असेल त्यांनीही जा. पण ठाकरे आणि शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा, माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरुन दाखवा, असं ते म्हणाले. माझं मुख्यमंत्रिपद नाकारणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे, झाडं न्या, फांद्या न्या, पण मूळ तुम्ही नेऊ शकत नाही… असंही मुख्यमंत्री म्हणाले.
ज्यांनी माझ्या कुटुंबीयांवर आणि मातोश्रीवर घाणेरडे आरोप केले, त्यांच्या मांडीला मांडी लावून मी बसणार नाही. मी शांत आहे पण षंढ नाही. ज्यांची स्वप्न होती ती आपण आजवर पूर्ण केली. पण आणखी काही स्वप्न असतील तर त्यांनी जावं. शिवसेनेची मूळं आजही माझ्यासोबत आहेत, असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. असेही ते यावेळी म्हणाले.
काही लोक सांगतायत की, माझ्या आवतीभोवती असणाऱ्या बडव्यांचा त्रास होतोय. आधी बाळासाहेब विठ्ठल आणि आम्ही बडवे, आता मी विठ्ठल आणि इतर बडवे हिच गोष्ट उद्या आदित्यसोबतही घडणार नाही का?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. आदित्यला बडवे म्हणायचं आणि स्वत:चा मुलगा खासदार हे चालतं, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली. तुम्हाला तुमच्या मुलाला मोठं करावसं वाटतं मग मला वाटणार नाही का?, असा, सवाल उपस्थित करत या सगळ्या गोष्टीचा वीट आला आहे. पण ही वीट आता डोक्यात हाणणार, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला.
दरम्यान, मी वर्षा सोडली म्हणजे मोह सोडला, जिद्द सोडलेली नाही. कोण कोणत्यावेळी आपल्याशी कसं वागलं हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. एकनाथ शिंदेंसाठी काय नाही केलं? माझ्याकडची 2 खाती मी शिंदेंना दिली. शिंदे बडव्यांबद्दल बोलतात, ज्यांचा मुलगा शिवसेनाकडून खासदार आहे. माझं मुख्यमंत्रिपद नाकारणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे, झाडं न्या, फांद्या न्या, पण मूळ तुम्ही नेऊ शकत नाही. बंडखोर आमदारांसाठी मी काय कमी केलं.संजय राठोडांवर अनेक आरोप झाले, त्या काळातही मी त्यांना सांभाळून घेतलं.. बाळासाहेबांचं माझ्याहूनही लाडकं आपत्य म्हणजे शिवसेना, ज्या शिवसेनेसाठी जीवही देईल असं जे म्हणायचे, तेच आज पळून गेले, जे गेले ते माझे कधीच नव्हते असं मी समजेन. मूळ शिवसेना माझ्यासोबत आहे, याचा मला आनंद आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.