जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२२ । मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता बकालेंना तात्काळ अटक झालीच पाहिजे, अशी मागणी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केली आहे.
आमदार मंगेश चव्हाण पुढे म्हणाले की, बकाले यांचा अटकपूर्व जामीन आज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे त्यांना तात्काळ अटक ही झालीच पाहिजे. कुणीही त्यांना पाठीशी घालता कामा नये. बकाले यांचे निलंबन झाले असले तरी आमची मागणी ही त्यांना बडतर्फ करण्याची आहे. त्यामुळे या प्रकरणात मी स्वतः बारकाईने लक्ष घालून आहे. अगदी त्यांना जामीन मिळू नये म्हणून हायकोर्टचं नव्हे तर, सुप्रीम कोर्टापर्यंत आमचा लढा सुरु राहील. संवेदनशील प्रकरण असल्यामुळे पोलिसांनी आता बकाले यांचा तात्काळ शोध घेत अटक केली पाहिजे. बकाले यांना जामीन मिळू नये, यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत देखील आमची लढाई सुरु ठेऊ, याचा पुनरुच्चार देखील आ. चव्हाण यांनी केला आहे.