जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२२ । जळगाव जिल्ह्यातील 15 तालुक्यातील ७२३ गावांमध्ये लंपी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. मात्र यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व गावांमध्ये शंभर टक्के लसीकरण प्रशासनाने पूर्ण केले आहे. मात्र लंम्पिमुळे आतापर्यंत १६५ जनावरांचा मृत्यू झाला आहे. लवकरच पशुपालकांना याबाबत आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
जळगाव जिल्ह्यात १५ तालुक्यात लांपीचा प्रादुर्भाव झाला असून गावातील पशुधन लंपीमुळे बाधित झाले आहे. गाय, बैल यांच्यात या आजाराचा संसर्ग जास्त प्रमाणात जाणवत आहे. गेल्या वर्षीही जळगाव जिल्ह्यात लंपी आला होता. मात्र त्याची इतकी तीव्रता नव्हती. यंदा याची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
जळगाव जिल्ह्यात ५ लाख ६० हजार ३६० पशुधन आहे. या सर्व पशुधनाचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यात जिल्हा पशुधन विभागाला यश आले आहे. मात्र जिल्ह्यात ७ हजार ५६६ पशु बाधित आढळत आले होते. यातील ३५८५ बरे झाले आहेत. तर १६५ पशुधनाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रशासनाकडून लवकरच याची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. यावेळी ही आकडेवारी बदलू शकते असेही म्हटले जात आहे
शासनाने लंपी मुळे मृत्यू झालेल्या जनावरांच्या मालकांना आर्थिक सहाय्य जाहीर केले आहे. अल्पभूधारक व्यक्तीला ही मदत मिळणार आहे. शासन निर्देशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्या समितीने हे प्रस्ताव मंजूर केल्यावर संबंधितांच्या बँकेत ही रक्कम जमा होणार आहे.