बुधवार, नोव्हेंबर 29, 2023

मुलीच्या शिक्षणासाठी पैसे नव्हते, पित्याची धरणात उडी घेऊन आत्महत्या; समोर आलं धक्कादायक कारण

जळगाव लाईव्ह न्यूज | २० जुलै २०२३ | मुलीच्या शिक्षणासाठी पैसे नसल्याने पित्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. जामनेर तालुकयातील शेंदुर्णी येथे पित्याने जीवनयात्रा संपवून घेतल्याचे खबळजनक वृत्त समोर आले आहे. संतोष सुरेश मराठे (वय ४७) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी शिवारातील गोंदेगाव धरणात संतोष मराठे यांनी उडी घेऊन आत्महत्या केली. जामनेर तालुकयातील खेडी गावात हे कुटुंब वास्तव्यास होते. संतोष मराठे यांनी त्यांच्या मावस भावाची जमीन पैसे देऊन घेतली होती. परंतु, पैसे दिल्यानंतरही जमीन मावस भावाने संतोष यांच्या नावावर केली नाही. तर दुसरीकडे संतोष यांना मुलीच्या शिक्षणासाठी पैसे लागत होते. त्यासाठी ते जमीन विकणार होते.

परंतु, मावस भाऊ जमीन नावावर करण्यासाठी टाळाटाळ करत होता. त्यामुळे या त्रासाला कंटाळून संतोष मराठे यांनी धरणात उडी घेवून आत्महत्त्या केली. याप्रकरणी, लहान भाऊ पंकज मराठे यांनी पहूर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारी वरून संशयित अरी वसंत रावण बागुल यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या केसचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहेत.