जळगावात सुरु आहे बोली भाषेतील पहिल्या वेब सीरिजचे शुटिंग

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२३ । शहरात नर्मदास फ्युचर फिल्म तर्फे खानदेशातील लेखकांनी लिहिलेल्या कथांवर आधारित व खान्देशातील कलावंतांना घेऊन ‘माझी बोली माझी वेब सिरीज’ या एपिसोडिक वेब सिरीजचे शुटिंग सुरु झाले आहे.
या वेबसिरीजमध्ये प्रत्येक कथेचे लेखक वेगवेगळे असून कथेतील कलाकारसुद्धा त्या त्या अनुषंगाने बदलणार आहे. या वेबसिरीजचे वैशिष्ट म्हणजे लेखक, दिग्दर्शक, कलाकार आणि संपूर्ण टेक्निकल टीम ही खान्देशातीलच असून याला जळगाव जिल्ह्यातील कलावंतांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ही वेबसिरीज पब्लिक फंडिंगच्या माध्यमातून तयार होत असून, वेबसिरीजसाठी एक निर्माता नसून अनेक निर्माते आणि दाते या वेबसिरीजच्या निर्मितीसाठी मदत करत आहेत. या धर्तीवर होणारा हा जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम आहे.
या वेबसिरीजचे दिग्दर्शक प्रशांत सोनवणे हे असून, त्यांनी आतापर्यंत माय माऊली मनुदेवी, लढा शिक्षणाचा, आणि एक नंबरचा ढ चित्रपट केलेले आहेत. तसेच त्यांच्यासोबत दिग्दर्शक म्हणून किरणकुमार अडकमोल आणि निर्मिती प्रमुख ऋषीकेश भरत धर्माधिकारी हे आहेत. या व्यतिरिक्त कॉश्चूमकरिता पुनम जावरे, सहाय्यक दिग्दर्शक म्हणून पवन इंद्रेकर, सागर अत्तरदे असून, कॅमेरा तेजस भंगाळे सांभाळत आहेत. या संपूर्ण टीम व प्रोडक्शनतर्फे वर्षभरात ११ वेब सिरीज करण्याचा मानस असून यासाठी जास्तीत जास्त खान्देशवासियांनी निर्मिती सहाय्य, कलावंत आणि लेखकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.