---Advertisement---
जळगाव शहर जळगाव जिल्हा राजकारण विशेष

खडसे – महाजनांमुळे रंगणार जिल्हा परिषदेचा आखाडा; वाचा काय असेल राजकीय समीकरण

Jilha-parishad-girish-mahajan-eknath-khadse
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ फेब्रुवारी २०२२ । भाजपाचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी काल जिल्हा परिषदेच्या निवडणूकीसाठी ४० प्लसचा नारा दिला आहे. ज्या-ज्या वेळी गिरीश महाजनांनी नारा दिला त्या-त्या वेळी तो त्यांनी तो कृतीत उतरवुन दाखविला. भाजपा सरकारच्या काळात राज्यातील नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे याठिकाणच्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची जबाबदारी गिरीश महाजनांवर सोपविण्यात आली होती. या प्रत्येक निवडणुकांमध्ये ५० प्लस, ४० प्लस अशा घोषणा करीत महाजनांनी राजकीय फासे फेकत डाव सहज जिंकले होते. ही जबाबदारी महाजनांनी यशस्वीरित्या पार पाडल्याने राज्यात त्यांचे राजकीय वजन वाढले होते.

Jilha-parishad-girish-mahajan-eknath-khadse

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून त्यांच्यावतीने महाजन शब्द देत होते आणि त्यांच्या शब्दावर राजकीय उलथापालथ होत होती. दरम्यानच्या काळात सत्तेत असतांना भाजपासाठी डोकेदुखी ठरू पाहणार्‍या एकनाथराव खडसेंचे खच्चीकरण करण्यासाठीच गिरीश महाजनांना ताकद दिली जात असल्याचे बोलले जात होते. पुढे खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे महाजन-खडसे शितयुध्दाचे खुल्या युध्दात रूपांतर झाले. सन २०१९ मध्ये शिवसेनेने भाजपाशी काडीमोड घेत विरोधक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी करीत महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली सत्ता स्थापन केली. ही सत्ता भाजपाच्या चांगलीच जिव्हारी लागली.

---Advertisement---

२५ वर्ष मित्र असलेले भाजपा आणि शिवसेना एकमेकांचे आता कट्टर राजकीय वैरी झाले आहेत. राज्यात नव्याने तयार झालेल्या राजकीय समिकरणांचे पडसाद तळागाळापर्यंत उमटायला सुरूवात झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने ९०० हून अधिक जागा निवडुन आणत ताकद दाखवुन दिली. आता राज्यात जिल्हापरिषद आणि उर्वरीत नगरपरिषदांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.

बालेकिल्ल्यातच भाजपाची कसोटी

जळगाव जिल्हा हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गत २० वर्षापासून जिल्हा परिषदेवर भाजपाची सत्ता आहे. जिल्हा परिषदेतील संख्याबळ घेता भाजपाचे ३३, काँग्रेस ४, शिवसेना १६, राष्ट्रवादी १४ असे संख्याबळ आहे. यात काँग्रेसच्या एका सदस्याने भाजपाला साथ दिल्याने भाजपाची एकहाती सत्ता आहे. भाजपाने आत्तापर्यंत ही निवडणूक स्वबळावरच लढविली होती. निकालानंतर मात्र सत्तेसाठी राजकीय बेरीज केली जात होती. आता राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणानंतरची होऊ घातलेली जिल्हा परिषदेची निवडणूक पहिली ठरणार आहे. या निवडणुकीत भाजपा विरूध्द शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे चित्र राहण्याची शक्यता आहे. अशातच जिल्हा परिषदेच्या गटांची फेररचना झाल्यामुळे १० गट वाढणार आहेत. म्हणजेच सदस्य संख्या दहाने वाढुन ७७ होणार आहे. त्यामुळे तीन विरूध्द एक अशी लढत लढतांना भाजपाला सामदामदंडभेद अशा संपुर्ण ताकदीनिशी रणांगणात उतरावे लागणार आहे.

काल झालेल्या जिल्हा बैठकीत गिरीश महाजन यांनी जिल्हा परिषदेसाठी ४० प्लसचा नारा देत रणशिंग फुंकले आहे. या बैठकीत ‘आपण जो शब्द देतो तो खरा करून दाखवितो’ असे विधानही महाजनांनी केले. महाजनांनी दिलेल्या शब्दावर भाजपाची तीनही पक्षांविरूध्द लढतांना आता खरी कसोटी लागणार आहे. कारण एकनाथराव खडसे यांचा प्रभाव असलेल्या रावेर मतदारसंघात भाजपाची पुरती दाणादाण उडाली आहे. त्यामुळे मिनी विधानसभा असलेली ही जिल्हा परिषदेची निवडणूक गिरीश महाजनांचे नेतृत्व सिध्द करण्यासाठीही तितकीच महत्वाची ठरणार आहे.

गुलाबराव- महाजनांच्या छुप्या युतीची चर्चा

राज्यात राजकीय समीकरण वेगळे असले तरी ‘दुश्मन का दुश्मन अपना दोस्त’ या म्हणीप्रमाणे एकनाथराव खडसे यांचे राजकीय विरोधक असलेले शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील आणि भाजपाचे गिरीश महाजन यांच्यात छुपी युती असल्याची चर्चा आहे. जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीने या चर्चेवर शिक्कामोर्तबही केले आहे. बोदवडमध्ये शिवसेनेला भाजपाच्या एका नगरसेवकाने सत्तेसाठी पाठींबा दिला आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि नगरपरिषदांच्याही निवडणुकीत ही छुपी युती कशी राहील याविषयी उत्सुकता आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---