जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२६ । राज्यात नगर परिषद, नगर पालिका निवडणुका पार पडल्यानंतर आता महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कधी जाहीर होणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. अशातच झेडपी निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर आलीय.

सुप्रीम कोर्टाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घेण्यात याव्यात असे आदेश दिले होते. यानंतर नगर परिषद, नगर पालिका निवडणुका झाल्यानंतर आता राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ जानेवारीला निकाल लागणार आहे. ही निवडणूक पार पडताच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे.

याच आठवड्यामध्ये दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकांसाठी पुढच्या महिन्यात ७ फेब्रुवारी रोजी मतदान होण्याची शक्यता आहे.

राज्यामधील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांसाठी निवडणूक होणार आहे. यामधील १७ जिल्हा परिषद आणि ८८ पंचायत समित्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली आहे. आरक्षणाच्या पेचामुळे जिल्हा परिषद निवडणुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मर्यादेमध्ये असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. याची तयारी राज्य निवडणूक आयोगाकाकडून केली जात आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लवकरच घोषणा होण्याची शक्यता असून ७ फेब्रुवारी रोजी यासाठी मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.







