⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मंगळवारी जिल्हा दौऱ्यावर!

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२२ । माजी मंत्री तथा युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे मंगळवार दि. ९ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जळगाव विमानतळावरून ते पाचोरा येथे जाणार असून ११.३० वाजता ते स्थानिक पदाधिकार्‍यांशी संवाद साधतील. दुपारी पावणेदोन वाजता धरणगावात सभा घेणार आहेत. ३ वाजता पारोळा येथे सभा घेतल्यानंतर ते धुळे, मालेगावमार्गे नाशिकला जाणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या दौर्‍याचे शिवसेना व युवासेनेतर्फे नियोजन करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडाचा पवित्रा घेतला. त्यांनतर राज्यात शिंदे गट व भाजपाची सत्ता स्थापन झाली असून मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारला आहे. यात जळगाव जिल्ह्यातील पक्षाचे चार तर समर्थक एक अशा पाच आमदारांनी शिंदे गटाची साथ घेतली आहे.

यामुळे जळगाव जिल्ह्यात शिवसेनेला जबर धक्का बसला असून शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळल्याचे आजचे चित्र आहे. मात्र एकीकडे आमदारांनी शिंदे गटाकडे धाव घेतली असली तरी बहुतांश पदाधिकारी अद्यापही उध्दव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी मातोश्रीवर भेट दिली. दरम्यान, उध्दव ठाकरे यांनी आक्रमक भाषण करून त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची ग्वाही दिली होती. या पाठोपाठ आदित्य ठाकरे हे जळगाव जिल्हा दौर्‍यावर येत आहेत.