
जळगाव लाईव्ह न्यूज । शेतकरी आणि आदिवासी बांधवांच्या प्रलंबित मागण्या व हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपासून आंदोलन संपेपर्यंत आकाशवाणी चौक ते स्वतंत्र चौक या मार्गावरील वाहतुकीत बदल लागू करण्यात आला होता.
लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने खान्देश मॉल येथून मोर्चाला सुरुवात करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलेल्या अधिसूचनेत नमूद आहे. शेतकरी व आदिवासी बांधवांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
आकाशवाणी चौक ते स्वतंत्र चौक मार्गावरील वाहतुकीत बदल
पोलीस अधिनियम कलम ३३ (१) (ब) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून पोलीस अधीक्षकांनी वाहतुकीतील तात्पुरत्या बदलाबाबत अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार आकाशवाणी चौक ते स्वतंत्र चौक या दरम्यानच्या मार्गावर वाहतुकीचे नियमन करण्यात आले आहे.
वाहनधारकांसाठी पर्यायी मार्ग
१. आकाशवाणी चौकाकडून स्वतंत्र चौकाकडे जाणारी वाहने व एसटी बसेस :
आकाशवाणी चौक → कवयित्री बहिणाबाई उद्यान → डॉ. खडके हॉस्पिटल / जिल्हापेठ पोलीस स्टेशन → स्वतंत्र चौक → बसस्थानक.
२. स्वतंत्र चौकाकडून आकाशवाणी चौकाकडे जाणारी वाहने व एसटी बसेस :
स्वतंत्र चौक → डॉ. खडके हॉस्पिटल / जिल्हापेठ पोलीस स्टेशन → कवयित्री बहिणाबाई उद्यान → आकाशवाणी चौक.
वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





