UPSC नागरी सेवा परीक्षेत चाळीसगावच्या तरुणाची बाजी
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२३ । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC CSE Exam Result 2023) नागरी सेवा परीक्षा 2022 चा अंतिम निकाल आज मंगळवारी जाहीर केला. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावच्या तरुणाने बाजी मारत शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. रोशन केवलसिंग कच्छवा असं या तरुणाचं नाव असून त्यांनी ऑल इंडिया रँकमध्ये 620 पटकावला आहे. त्यांच्या या यशाने सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे.
UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षा 2022 ही 16 ते 25 सप्टेंबर 2022 या कालावधीत झाली. यात 2,529 उमेदवार उत्तीर्ण होऊन त्यांना मुलाखतीसाठी बोलविण्यात आले होते. आता आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात आला असून एकूण 933 उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे. या परीक्षेत इशिता किशोर हिने संपूर्ण भारतातून पहिला क्रमांक पटकाविला आहे.
तर या परीक्षेत चाळीसगावचे रोशन केवलसिंग कच्छवा यांनी देखील बाजी मारली आहे. रोशन कच्छवा यांनी परीक्षेचे सर्व तीन टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण करून ऑल इंडिया रँक 620 पटकावला आहे. रोशन कच्छवा हे सर्वोदय संस्थेच्या संचालिका कोकिलाबाई केवलसिंग कच्छवा व स.मा. विद्यालय सायगावचे केवलसिंग कच्छवा यांचे ते चिरंजीव आहेत. तसेच ते बी.डी.पवार यांचे भाचे आहेत. दरम्यान, त्यांच्या या निवडीने सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे.
दरम्यान, UPSC CSE ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते आणि या परीक्षेतील उमेदवारांचे यश हे त्यांच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि चिकाटीचा दाखला आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची विविध क्षमतांमध्ये देशाची सेवा करण्यासाठी निवड केली जाते आणि ते देशाची धोरणे आणि कार्यक्रम तयार करण्यासाठी जबाबदार असतात.