जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२१ । सासू-सासऱ्यांच्या जाचाला कंटाळून एक ३२ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे घडलीय. ही घटना आज रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आली आहे. अमोल प्रकाश धनगर (वय ३२ रा. अशोकनगर, शिरसोली प्र.न.) असे मयत तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, अमोल धनगर यांच्या खिशात सुसाईड नोट आढळली आहे. तसेच आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवले होते. त्यात सासू-सासऱ्याच्या त्रासाला कंटाळून माझी जीवन यात्रा संपवीत असल्याचं म्हटलं आहे.

याबाबत असे की, शिरसोली येथील अशोकनगर मध्ये अमोल धनगर आपल्या पत्नी, मुले, आई-वडीलांसोबत राहत होते. ते बकरी चारण्याचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत होते. शिरसोली जळके रोडवरील भोलेनाथ नगरमधील बकऱ्यांच्या शेडमध्ये दररोज रात्री अमोल झोपायला जायाचा. शनिवारी रात्री त्याने वडिल प्रकाश धनगर यांना झोपण्यासाठी पाठवले होते. तो घरी झोपला होता. रविवारी सकाळी ६:३० वाजता वडील प्रकाश धनगर घरी आले. त्यांना अमोल हा छताच्या हुकाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे निदर्शनास आले.


यावेळी त्यांनी आरडाओरडा केला. गल्लीतील लोक धावले. पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी त्यांचा मृतदेह खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. अमोल याच्या खिशात सुसाईड नोट आढळली आहे. यात त्याने सासु सासरे यांच्या धमक्या व छळाला कंटाळून मी जीवन यात्रा संपवत आहे, असे नमुद केले आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत. त्यांच्या पश्चात १मुलगा २ वर्षाचा वेदांत, १ मुलगी ४ वर्षाचा तेजश्री, पत्नी, वडील, भाऊ आहे. अमोलची पत्नी एक ते दीड महिन्यापासून मुलांना घेऊन माहेरी गेली आहे.
काय म्हटले आहे सुसाईड नोट मध्ये ?
आज मी माझी जीवनयात्रा संपवत आहे. कारण माझी सासूबाई आणि सासरा रा. रत्नपिंप्रीचे आहे. ते मला फार त्रास देतात आणि फोन वरती धमकी पण. म्हणून मी माझी जिवन यात्रा संपवत आहे. त्याच्यावर कठोर कारवाई करा, ही नम्र विनंती. माझा बकरीचा व्यवसाय आहे. त्या बकऱ्या विकून जे पैसे येतील ते पैसे माझ्या मुलाच्या आणि मुलीच्या नावावर टाकावे. जेणेकरून त्यांना पुढे काही अडचण येणार नाही, ही माझी शेवटची इच्छा आहे.












