जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२२ । चाळीसगाव तालुक्यातील गणेशपूर येथील अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारी व नापिकीमुळे कंटाळून शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सुकलाल संतोष पाटील (वय ३५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून पावसामुळे पीक वाया जात असल्यामुळे सुकलाल पाटील वैतागून गेले होते. चतुर्भज शिवारात आईच्या नावे दोन एकर शेती आहे. आईचा सांभाळ तेच करत. एकमेव कर्ता पुरुष म्हणून त्यांच्यावरच जबाबदारी होती. यावर्षी कपाशीचे पीक अतिवृष्टीमुळे वाया गेल्याने सोसायटी व शेतीसाहित्याचे कर्ज तसेच खाजगी सावकारी व हात उसनवार कर्जही कायम राहिल्याने कर्जाचा डोंगर वाढत गेल्याने ते वैफल्यग्रस्त झाले होते.
साेमवारी ते सकाळी शेतात गेले ते रात्री ८ वाजेपर्यंत घरी आले नाही. शोध घेतला असता शेतातील झाडालाच गळफास घेतल्याचे अाढळले. त्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त हाेत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा व वृद्ध आई असा परिवार आहे.