⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्याला १० वर्ष सश्रम कारावास

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२१ । शहरातील एका आरोपीने अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला. पीडित तरुणी गर्भवती होऊन तिला मुलगा झाल्यानंतर देखील तरुणाने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन जिल्हा न्यायालयात कामकाज झाले असता न्यायालयाने आरोपीला १० वर्ष सश्रम कारावास आणि ३ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

जळगांव येथील जयकुमार अशोक सोनवणे याने पिडीतेशी तिच्या मैत्रीणीकडून जवळीक साधून लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने वेळोवेळी बलात्कार केला मात्र तिच्याशी लग्न केले नाही, सदरील अत्याचारातुन पिडीतेस मुलगा जन्मास आला. तरीही लग्न न केल्याने पिडीतेने शहर पोलिस स्टेशन, जळगाव येथे गुर, ४०/२०१५ अन्वये कलम ३७६ व इतर सह कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. या बाबत सविस्तर हकीकत अशी की, यातील पिडीता व आरोपी दोघे एकाच समाजाचे असुन पिडीता सन २०११-२२ मध्ये जळगाव येथे शासकीय अभियांत्रिकी वसतिगृहात राहत होती. त्यानंतर सन २०१३-१४ पावेतो पिडीता तिचे मैत्रीणी सोबत एकाच खोलीत रहात होती. त्या वेळी आरोपीने तिच्या मैत्रीणीमार्फेत पिडीतेशी जवळीक साधून तिला प्रेमात गुंतवून आरोपीने त्याच्या घरी, साईराम लॉज, जळगाव येथे तसेच वेळोवेळी कार मध्ये निर्जन स्थळी नेवून जुलै २०१४ पासून फेब्रुवारी २०१५ पर्यंत लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवले.

सदर खटला सेशन केस नं. १३०/ हा जिल्हा व सत्र न्यायाधीश-१, जळगाव पी.वाय लाडेकर यांच्या न्यायालयात चालला. यात सरकार पक्षातर्फे १० साक्षीदार तपासण्यात आले. पिडीतेचा जबाब व वैदयकिय पुरावा विशेषत डीएनए रिपोर्ट या बाबी महत्वाच्या ठरल्या. सदरील बलात्कार प्रकरणी आरोपीस दोषी ठरवून भा.द.वि. कलाम ३७६ खाली १० वर्ष सश्रम कारावास व रु ३,००,०००/- (अक्षरी रुपये तीन लाख मात्र) दंड, दंड न भरल्यास एक वर्ष साधी कैद व कलम ४१७ खाली फसवणुकी बाबत सहा महिने सनम कारावास व रु.३०००/- दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली.

तीन लाख रुपये दंड वसुल झाल्यावर ती रक्कम पिडीतेस व त्यांच्या मुलास नुकसान भरपाई म्हणून चरितार्थासाठी देण्याबाबतचे आदेश आहेत. सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकिल ऍड.पंढरीनाथ चौधरी यांनी काम पाहिले. तसेच त्यांना पैरवी अधिकारी ताराचंद जावळे यांनी सहकार्य केले.