
जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑक्टोबर २०२५ । महाराष्ट्रावर मोंथा चक्रीवादळाचं संकट कायम असल्याने पावसाने जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी पुन्हा हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान हवामान खात्यानं आज ३१ ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून निर्माण झालेली पावसाळी स्थिती अजूनही कायम असून, पुढील आठवडाभर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा सामना करावा लागणार आहे. सुरुवातीला अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आणि आता ‘मोंथा’ चक्रीवादळामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या आठवडाभरात सुमारे ५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे जिल्ह्यात ढगाळ वातावरण व पावसाची स्थिती कायम आहे.

या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. काढणीला आलेल्या कापूस पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. तसेच ज्वारी, दादर आणि मका या खरीप पिकांवरही मोठा परिणाम झाला आहे. सततच्या पावसामुळे पिके खराब होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. यातच हवामान विभागाने २ नोव्हेंबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र, आता पुढील आठवडाभर जिल्ह्यात हीच स्थिती कायम राहणार असल्याचा नवा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
यामुळे उरलं सुरले पीकही शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची भीती आहे. दरम्यान या सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले असले तरी, भूजल पातळी वाढल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे रब्बीचा पेरा वाढण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.






