सावधान! पुढील दोन दिवस जळगावला ‘येलो अलर्ट’ ; अवकाळीमुळे जिल्ह्याचा पारा घसरला..

एप्रिल 21, 2026 11:01 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२६ । गेल्या आठवडाभरापासून कडाक्याच्या उन्हामुळे होरपळणाऱ्या जळगावकरांना अवकाळी पावसाने काहीसा दिलासा दिला आहे. रविवारी रात्री जळगाव शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत झालेल्या पावसामुळे सोमवारी (दि. २०) तापमानात २ अंशांची घट नोंदवण्यात आली. यामुळे जिल्ह्याचा पारा चाळीशीच्या खाली असला, तरी वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे नागरिकांना उकाड्याचाही सामना करावा लागला.

rain

दरम्यान जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मुक्काम संपूर्ण आठवडाभर राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. २१ आणि २२ एप्रिल या दोन दिवसांसाठी हवामान विभागाने जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या काळात जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

२५ एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता

जिल्ह्यात अवकाळी पावसाचे सावट २५ एप्रिलपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे येत्या काही दिवसांत तापमानात आणखी काही अंशांनी घट होऊ शकते. मात्र, ढगाळ वातावरण आणि पावसामुळे आर्द्रता वाढणार असल्याने दिवसा उकाडा जाणवण्याची चिन्हे आहेत. तरीही कडक उन्हाच्या लाटेपासून जळगावकरांना काही दिवस दिलासा मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories