जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२६ । सध्या जळगाव जिल्ह्यात सूर्य अक्षरशः आग ओकत आहे. जिल्ह्यात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस तीव्र होत असून, सलग वाढणाऱ्या तापमानामुळे जनजीवनावर मोठा परिणाम होताना दिसत आहे. दरम्यान, मंगळवार, १२ मे रोजी जळगाव शहराचा पारा ४५.५ अंशांपर्यंत पोहोचल्याची अधिकृत नोंद आयएमडीच्या ममुराबाद वेधशाळेत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हे यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमान ठरले असून, असह्य उन्हामुळे जळगावकरांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

जळगाव शहरातील गेल्या ११ वर्षातील उन्हाळ्यातील विचार केला तर, २०२२ आणि २०२४ मध्येही कडक उन्हाळा जाणवला होता. मात्र, त्या वर्षांतील एकूण सरासरी तापमान २०१७आणि चालू २०२६ सालाच्या तुलनेत कमीच होते. २०१७ नंतर केवळ २६ मे २०२४ आणि आता १२ मे २०२६ रोजीच पाऱ्याने ४५.५ अंशांचा टप्पा गाठला आहे.

हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी आधी १३ मे पर्यंत ‘यलो अलर्ट’ दिला होता. मात्र, आता त्यात आणखी एका दिवसाची भर घालण्यात आली असून १४ मे पर्यंत यलो अलर्ट कायम राहणार आहे. याचा अर्थ पुढील दोन दिवस जळगावकरांना उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागणार आहेत. नागरिकांनी दुपारच्या वेळी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
२० मे नंतर वळीव पावसाची शक्यता
गेल्या महिनाभरापासून उन्हाच्या चटक्यांनी हैराण झालेले जळगावकर आता पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. चालू आठवड्यात तरी उष्णतेचा हा कहर असाच सुरू राहील. मात्र, हवामान अंदाजानुसार २० मे नंतर जिल्ह्यात वळीव पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तोपर्यंत जळगावकरांना या उष्णतेचा तडाखा सोसावा लागणार असून, आता सर्वांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.







