जळगाव जिल्हाहवामान

सूर्य तापला ! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उष्णेतेची लाट, जळगावसाठीही महत्वाचा इशारा

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२६ । मार्च महिन्याची सुरुवात होताच जळगावसह राज्यात उष्णतेची तीव्रता वाढू लागली आहे. सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवत असून दुपारच्या सुमारास सूर्य आग ओकत असल्याने उकाड्याचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. दरम्यान हवामान खात्यानं राज्यातील काही भागांत उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला असून जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात तापमान वाढीचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे उकाड्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

tapman 2

जळगाव जिल्ह्यात तापमान झपाट्याने वाढत असून ते ४० अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचले आहे. गेल्या २४ तासात जळगावचे कमाल तापमान ३८.५ इतके होते. तर किमान तापमान १७ अंशापर्यंत होते. दरम्यान उन्हाची तीव्रता वाढल्याने दुपारच्या वेळी बाहेर पडताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान आगामी काही दिवस जळगावकरांना उन्हाच्या तीव्रतेचा सामना करावा लागू शकतो.

राज्यातील काही भागांत उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये पुढील ४८ तास उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामान राहण्याचा अंदाज व्यक्त करत ‘यलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे.

तर नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातही तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून जळगाव जिल्ह्यासह नाशिक, धुळे आणि अहिल्यानगर या भागांत पुढील चार ते पाच दिवस कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उकाड्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

उष्णतेची तीव्रता लक्षात घेता नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे आणि आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button