⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

धक्कादायक : जळगाव शहरातील १०८ इमारती केव्हाही कोसळू शकतात !

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२२ । दरवर्षी पावसाळा आला की पावसाळ्यामध्ये कुठे ना कुठे जीर्ण झालेली किंबहुना धोकादायक इमारत पडतेच. गतवर्षी जळगाव शहरात देखील अशाच प्रकारची एक इमारत पडली होती. यंदाही जळगाव शहरातील 108 इमारतींना धोका घोषित करण्यात आले आहे. जळगाव शहरात १०८ पडक्या इमारतींची नोंद महापालिका प्रशासनाकडे आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर या इमारतींच्या मालकांना नोटीसा देण्या व्यतीरिक्त कुठलीही ठोस कार्यवाही महापालिकेकडून केली जात नसल्याने या इमारती अधिकाधिक धोकेदायक झाल्या आहेत.

पावसाळा म्हटला की, धोकादायक इमारती या कोसळतात कारण की, पावसाळ्यामध्ये जमिनीखाली पाणी साचल्याने जमिनीची इमारतीवरील पकडही ढिली होते. ज्यामुळे या धोकादायक इमारती एखाद्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे खाली पडतात. जळगाव शहरात १०८ इमारती कनिष्ठ अभियंत्यांनी सर्वेक्षण करून धोकेदायक ठरविण्यात आल्या आहेत. दरवर्षी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या इमारतीच्या मालकांना नोटीस बजावण्याचा केवळ फार्स महापालिका प्रशासनाकडून केला जातो. मात्र, येथे राहणारे रहिवाशी व मालक याला गांभीर्याने घेत नसल्याने दिवसोंदिवस या इमारतींचा धोका वाढत आहे.

दरवर्षी महापालिका मालकांना ‘महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम २६५ (अ) अन्वये नोटीस बजावते. मात्र काहीच उपयोग होत नाही. १९५० मधील तरतुदीनुसार नोटीस दिल्यानंतर होणाऱ्या जीवित किंवा वित्तहानीस इमारत मालक जबाबदार असतो. त्यात दंडात्मक शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत मनपाकडून अशा प्रकारे कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही.