⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

महिलादिन विशेष : सौ. प्रिती रोहित तिवारी

सूनबाई नव्हे तर कन्याच !

जळगाव लाईव्ह न्यूज । महिलादिन विशेष । आमचा पुत्र रोहितची पत्नी सौ. प्रिती हिचे आणि आमचे नाते सासू-सासरे आणि सून असे नाही. प्रितीला विवाह करून तिवारी कुटुंबात आणले त्याच दिवशी तिने आम्हाला ‘मम्मी-पपा’ म्हणणे सुरू केले. दुसरे अपत्य असायला हवे होते ही आमची दडवलेली इच्छा गेल्या १६ महिन्यांत प्रितीने पूर्ण केली. प्रिती सूनबाई कमी आणि कन्या जास्त झाली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेचा प्रकोप सुरू असताना प्रिती-रोहितचा विवाह निश्चित केला. दुसरी लाट असताना विवाह विधी पूर्ण झाला. अनेक मान्यवर आणि ज्येष्ठांनी विवाह कार्य पूर्ण करायला अदृश्य आणि अव्यक्त सहकार्य केले. अखेर प्रिती घरी आली. गंमत असते नात्यांची. आई, बहिण व पत्नीने चहा दिला तरी फारसे लक्षवेधी ठरत नाही. पण सूनबाईने न मागता पाण्याचा ग्लास दिला आणि नंतर गरम चहा दिला की जगातले सर्वांत सुखी सासू-सासरे ठरण्याचा मान मिळतो. प्रिती अशा संस्कारांच्या बाबतीत कितीतरी पुढे आहे. गेल्या १६ महिन्यांत रोहितशी अपवादाने पण प्रितीशी रोज गप्पा होतात. अलिकडे रोहित हसून म्हणतो, ‘मी तुमचा सावत्र जावाई झालोय !’

प्रिती फायनान्स विषयातली पदवीधर. मुंबईत ॲक्सिस व आयडीबीआय बँकेत तीने कर्ज वितरत विभागात ‘कस्टमर रिलेशन’ विभाग सांभाळला. प्रिती बहुधा त्या कार्यामुळे बडबडी झाली. कोणत्याही नातेवाईकाशी भरभरून बोलणार. तिला जर कोणी विचारले, ‘प्रिती कशी आहेस ‘? तर पट्कन उत्तर देणार ‘एकदम मजेमे’ या संवादानंतर बोलायला आम्हाला काही उरतच नाही. मुद्दा आहे प्रितीच्या ‘कस्टमर रिलेशन’ कौशल्याचा. बँका गंगाजळीचे कर्ज गरज नसलेल्यांच्या गळी उतरवायला तत्पर असतात. घरासाठी, वाहनासाठी, कोणत्याही वस्तूसाठी, अगादी कशालाही कर्ज द्यायला बँका व खासगी वित्तीय संस्था तत्पर आसतात. प्रितीचा या कार्यातला अनुभव उत्तम.

पुण्यात मंत्रा प्रॉपर्टीज् गृपमध्ये प्रितीला तिच्या आवडीचे काम पुन्हा मिळाले. कामावर जाण्याच्या पहिल्या दिवशी तिचे औक्षणकरून आम्ही उभयता ‘यशस्वी भवा’ हा आशीर्वाद दिला. गेल्या दोन महिन्यात कामात छानपणे रूळली. पत्नी नोकरी करीत असेल तर पतीने घरातील कामात ५० टक्केवर कामे करायला हवीत हे आम्ही रोहितला आवर्जून सांगितले. आम्हाला आनंद हाच आहे की, दोघे संसाराला लागले. प्रिती रोहितपेक्षा जास्त समजदार आहे. प्रितीला सौ, सरोजने सहज विचारले, ‘बेटा कार्पोरेटमध्ये काम करताना काय वाटते ?’ तेव्हा प्रौढ झाल्यागत ती म्हणाली, ‘मम्मी, कार्पोरेट में रोज कंपिटीशन है l रोज दौडना है l लेकीन हम कंपिटीशन भी करते है और सिखते भी है l कस्टरमर रिलेशन, केअर या रिस्पॉन्स ये जॉब बहुत आनंद देता है l रोज नए नए और अलग अलग क्षेत्र के लोग संपर्क में आते है l बात होती है l पहचान होती है l इसी पहचानसे आगे अपनेभी काम होते है l कार्पोरेट में संयम जरूरी है l जहाँ संयम है वहाँ हमारा काम उतनाही सरल है l’ मानवी व्यवहाराचे साधे सूत्र २५ वर्षांची प्रिती आम्ही उभयता पन्नाशी पार केलेल्यांना समजावते.

प्रितीने हेच सूत्र त्याःच्या संसारात अमलात आणले आहे. एवढ्या कमी वयात आपल्या कार्य, कौशल्य आणि जबाबदारीचे भान प्रितीला आहे. आम्हाला याच स्वभावाचे भलतेच कौतुक आहे. दोघांच्या संसारात दोघांची नोकरी सांभाळून धावपळ करीत दोघेही कोणताही त्रागा न करता एकमेकांची काळजी घेतात यात आम्हाला आनंद आहे. आम्हीही एक पथ्य पाळले आहे. ज्या लहानसहान गोष्टींमध्ये त्यांना आनंद मिळतो त्यात आम्ही हस्तक्षेप करीत नाही. प्रितीच्या पालकांवरही हे बंधन लादलेले आहे. लाख आणि कोट्यवधी रूपयांच्या संपत्तीपेक्षा आम्हा उभयतांना रोज सायंकाळी कॉल करून ‘मम्मी-पपा खाना हो गया ?’ हे विचारणारी प्रिती सूनेपेक्षा कन्या झालेली जास्त भावाते …

(दिलीप तिवारी, जळगाव)

सौजन्य : Dilip Tiwari’s Diamond’s Group