एसटी बस तिकिटदरात महिलांना मिळणार ५० टक्के सवलत; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

जळगाव लाईव्ह न्यूज | ९ मार्च २०२३ |  राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्ष २०२३-२४ अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महिला आणि शेतकर्‍यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. महिलांसाठी सर्वात मोठी घोषणा म्हणजे, सर्व महिलांना एसटी प्रवासात तिकिट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा फडणवीस यांनी केली आहे.

फडणवीस म्हणाले की, आम्ही चौथे सर्वसमावेशक महिला धोरण घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुलींच्या सक्षमीकरणाकरता ‘लेक लाडकी’ ही नवी योजना सुरू करण्यात येईल. तसेच महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण लागू करणार असल्याचेही ते म्हणाले.

शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने ५० वसतीगृहांची निर्मिती करण्यात येईल. तसेच लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी ‘स्वाधार’ आणि ‘उज्वला’ या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना सुरू करण्यात येईल. या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन आदी सेवा पुरवण्यात येईल, अशी घोषणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

अंगणवाडी सेविकांबाबतही फडणवीस यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या. अंगणवाडी सेविकांचे मानधन ८३२५ वरुन १० हजार रुपये करण्यात येईल. तसेच मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ५९७५ वरुन ७२०० रुपये करण्यात येईल, अशी घोषणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. याबरोबरच अंगणवाडी मदतनिसांचे मानधन ४४३५ वरुन ५५०० रुपये करण्यात येईल आणि अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची २० हजार पदे भरणार, अशी माहितीही त्यांनी दिली.