⁠ 
सोमवार, मे 6, 2024

रक्षा खडसेंची संपत्ती 10 वर्षात किती कोटींनी वाढली? प्रतिज्ञापत्रातून संपत्तीचा आकडा समोर

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२४ । जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली असून त्यांनी गुरुवारी (दि २५) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी रक्षा खडसे यांच्या संपत्तीचा आकडा समोर आला आहे. रक्षा खडसे यांनी सादर केलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्या संपत्तीमध्ये सन २०१४ ते २०२४ या गेल्या दहा वर्षात ४ कोटी ५१ लाख ८३ हजार १५ रुपयांनी वाढली आहे.तर वार्षिक उत्पन्नातही ७५ लाख ९१ हजार २७८ रुपयांनी भर पडली.

सन २०१४ मध्ये रक्षा खडसे यांनी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार त्यांचे सन २०१२-१३ चे वार्षिक उत्पन्न १३ लाख ६२ हजार ११२ रुपये होते. त्यावेळी त्यांच्याकडे ५ कोटी ९९ लाख ७८ हजार ८७ रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता, मुलगी क्रिशिकाकडे ४ कोटी १५ लाख ४७ हजार ३७३ रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता तर मुलगा गुरुनाथकडे ४ कोटी २६ लाख ९७ हजार ३७३ रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता दाखवण्यात आली होती. त्यावेळी खडसे यांच्याकडे ५ लाख ९० हजार रुपयांचे सोने व २६ लाख ८१ हजारावर किमतीच्या दोन कार असल्याचे शपथपत्रात नमूद करण्यात आले होते. खासदारकीच्या पहिल्या टर्मनंतर ७३ लाखांनी वाढले.

सन २०१९ मध्ये खडसे या दुसऱ्यांदा खासदार झाल्या. या निवडणुकीतील शपथपत्रानुसार त्यांचे उत्पन्न २०१४ च्या तुलनेत ७३ लाख ९३ हजार २११ रुपयांनी वाढले. त्यावेळी त्यांच्याकडे १७ लाखांवर रोख रक्कम होती. २०१४ नंतर सन २०१९ पर्यंत त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता १ कोटी ६६ लाख २७ हजार ५४१ रुपयांनी वाढून ७ कोटी ६६ लाख ५ हजार ६२८ रुपयांपर्यंत वाढली. मुलगी क्रिशिकाची स्थावर व जंगम मालमत्ता ४ कोटी ६० लाख ९७ हजारांवर पोहोचली. मुलगा गुरुनाथची मालमत्ता ५ कोटींवर पोहोचली. रक्षा यांच्याकडे ६ लाख ६४ हजार रुपयांचे २०० ग्रॅम सोने असल्याचे शपथपत्रात नमूद करण्यात आले होते. सन २०१४ नंतर त्यांनी ३१ लाख ६५ हजार ८८३ रुपयांची कार खरेदी केली. ही सर्व माहिती त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रात दिलेली आहे

दोनवेळा खासदार झाल्यानंतर रक्षा खडसे या तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांनी शपथपत्रात नमूद केल्यानुसार सन २०२२-२३ चे त्यांचे वार्षिक उत्पन्न ८९ लाख ५३ हजार ३९० रुपये आहे. त्यांच्याकडे ४ लाख ५० हजार रोख रक्कम आहे. त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता १० कोटी ५१ लाख ६१ हजार १०२ रुपये आहे. १४ लाख ७० हजार रुपयांचे २१० ग्रॅम सोने त्यांच्याकडे आहे. ३४ लाख ६९ हजार ९०० रुपयांची नवीन कार खरेदी केली आहे. त्यांच्यावर ७७ लाख ३६ हजार रुपयांचे दायित्व आहे. त्यांच्यावर अवलंबून असलेली मुलगी क्रिशिकाची स्थावर व जंगम मालमत्ता ३ कोटी ७० लाख ४४ हजार ११८ रुपयांची तर मुलगा गुरुनाथकडे ३ कोटी ९९ लाख १२ हजार ५७० रुपयांची मालमत्ता असल्याचे शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे