⁠ 
सोमवार, जुलै 22, 2024

जिल्हा पोलीसदलात महिला अधिकारीच ठरल्या टॉपर!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | चेतन वाणी । जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार हे अट्टल गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरत असून मोक्का, एमपीडीए आणि हद्दपारीच्या प्रस्तावामुळे अनेकांना पळता भुई थोडी झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ४० एमपीडीए प्रस्तावांना मान्यता दिली असून त्यात सर्वाधिक रामानंद नगर पोलीस ठाणे हद्दीतील आहे. निरीक्षक शिल्पा पाटील यांनी अवघ्या ६ महिन्यात ९ प्रस्ताव तयार पुढे पाठविल्याने त्याच कारवाईत अव्वल ठरल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यात पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर वर्षभरात ‘अबतक 56’ चे टार्गेट ठेवत कामाला सुरुवात केली. मारझोड कमी आणि कागदाने जास्त दणका देण्याची त्यांची पद्धत चांगलीच प्रभावी ठरली आहे. पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मागविले. सुरुवातीला काही अधिकारी बदलीच्या प्रतीक्षेत असल्याने त्यांनी ते टाळले मात्र नंतर झालेल्या बदली नंतर नव्याने आलेले अधिकारी कामाला लागले. स्थानिक पोलीस ठाण्याकडून आलेल्या प्रस्तावांना स्थानिक गुन्हे शाखेकडून मूर्तरूप देण्यात आल्यानंतर पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी ते जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे पाठविले. पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या कार्यकाळात ४० गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

९ महिन्यात ३८ एमपीडीए कारवाया
जानेवारी २०२३ पासून आजपावेतो तब्बल ३८ गुन्हेगारांवर एमपीडीएची कारवाई करण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक रामानंद नगर पोलीस ठाणे ९, एमआयडीसी ६, भुसावळ बाजारपेठ ५, अमळनेर ४, चाळीसगाव ३, भुसावळ शहर ३, चोपडा शहर २, रावेर, जळगाव शहर, जळगाव तालुका, फैजपूर, भुसावळ तालुका, पारोळा प्रत्येकी १ एमपीडीए कारवाई करण्यात आली आहे.

रामानंद नगर पोलीस ठाणे अव्वल
एमपीडीए कारवाईच्या बाबतीत जळगाव जिल्ह्यात रामानंद नगर पोलीस ठाणे अव्वल ठरले आहे. रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी पदभार स्वीकारल्यापासून सर्व गुन्हेगारांची कुंडली काढली. अवघ्या ६ महिन्यात रामानंद नगर पोलीस ठाणे हद्दीतील रणजितसिंह जुन्नी, प्रकाश कंजर, विशाल कोळी, विश्वास गारुंगे, धन्नो नेतलेकर, गणेश कोळी, नितेश जाधव, राहुल कानडे, सचिन चव्हाण यांच्यावर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

गुन्हेगारांना बसला वचक, ४ प्रस्ताव प्रलंबित : शिल्पा पाटील
रामानंद नगर पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गुन्हेगारांची माहिती मागविल्यावर एमपीडीए प्रस्ताव पाठविण्यात आले. पोलीस अधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा आणि वरिष्ठांचे आम्हाला नेहमी मार्गदर्शन लाभल्यानेच हे शक्य झाले. अद्यापही ४ प्रस्ताव प्रलंबित असून हद्दपारीचे देखील प्रस्ताव आहेत. नियमीत कारवाया सुरू असल्याने आमच्या हद्दीतील अनेक गंभीर गुन्हे कमी झाले असल्याचे निरीक्षक शिल्पा पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यात एमपीडीए कारवाया सुरूच राहणार : पोलीस अधीक्षक
जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी एमपीडीए कारवाईचे प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत. सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करून प्रशिक्षण देण्यात आल्यानेच ते प्रस्ताव पुढे जाऊन मान्यता मिळत आहे. एमपीडीए कारवाई आणि इतर प्रतिबंधात्मक कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी होण्यास मदत झाली आहे. रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी शिल्पा पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या पथकाने केलेल्या कामगिरीमुळे त्यांचे अभिनंदन. भविष्यात देखील जास्तीत जास्त कारवाया करण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी सांगितले.