⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

‘सुंदरी’ने रेल्वेतच दिला ‘सुंदरी’ला जन्म, भुसावळात प्रवाशांनी ओढली चेन

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२१ । रेल्वेत गरोदर महिलेची प्रसूती होण्याच्या घटना क्वचितच होत असतात. उत्तरप्रदेशहून पनवेल येथे पतीकडे जात असलेल्या एका महिलेने रेल्वेतच कन्येला जन्म दिल्याचा प्रकार भुसावळ रेल्वेस्थानकावर घडला. रेल्वे भुसावळ स्थानकातून प्रस्थान करीत असतानाच महिलेला प्रसूती वेदना सुरु झाल्या. प्रवाशांनी वेळीच प्रसंगावधान दाखवीत चेन पुलींग करीत रेल्वे थांबविली तर महिला प्रवाशांनी गरोदर महिलेला आधार दिल्याने सुंदरी यांनी एका सुंदर कन्येला जन्म दिला आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सुंदरी रामसुमेर (वय २८, रा.शौरतगढ़ उत्तरप्रदेश) या आपल्या काकू विमलाबाई (रा.शौरतगढ़, उत्तरप्रदेश) यांच्यासोबत गोरखपुर सुपरफास्ट एक्सप्रेस (गाडी क्रमांक ०५०६५) ने सोहरागडहून पनवेलला आपल्या पतीकडे जात होत्या. या गाडीतील एस-वन या डब्यातून प्रवास करीत होत्या.

भुसावळला शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता रेल्वे पोहचली. दहा मिनिटे थांबल्यानंतरही ही गाडी पुन्हा पनवेलच्या मार्गाने रवाना व्हायला सुरुवात झाली. मात्र, गाडी स्टेशनमधून बाहेर पडतांना सुंदरी यांना तीव्र वेदना सुरू झाल्या. यावेळी डब्यातील प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवीत गाडीचे चेन ओढून गाडी थांबविली.

महिलेची गाडीतच झाली प्रसूती

चेन ओढळल्यानंतर स्टेशनवर बंदोबस्तासाठी असलेली रेल्वे पोलीस तात्काळ संबंधित डब्याकडे धावले. यावेळी त्यांना गाडीत महिलेची प्रसूती होत असल्याचे सांगण्यात आले. डब्यातील इतर महिलांच्या मदतीने सुंदरी यांची सुखरूप प्रसूती झाली. रेल्वे पोलिसांनी महिलेला साडी व दुपारच्या जेवणाची व्यवस्था करीत भुसावळ नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. सर्वांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे आई आणि बाळ दोन्ही सुखरूप असून महिलेच्या पतीला कळविण्यात आले आहे.