जळगावात हिट अँड रनचा थरार : भरधाव कारने घरासमोर उभ्या ५ महिलांना उडवले; वृद्ध महिला ठार

जुलै 18, 2024 10:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२४ । जळगाव शहरात हिट अँड रनची थरारक घटना समोर आली आहे. मेहरुण परिसरातील मंगलपुरीत गल्लीत आपल्या घरासमोर उभे राहून गप्पा मारणाऱ्या ५ महिलांना भरधाव कारने जबर धडक दिली. या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. शोभा रमेश पाटील (वय ६० रा. साईप्रसाद कॉलनी, मंगलपूरी, मेहरुन) असे मृत महिलेचे नाव आहे. तर या अपघातात अन्य चार महिला जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

jalgaon mahanagar palika 10 jpg webp

याबाबत असे की, मेहरूण परिसरातील मंगलपुरी भागात काही महिला गप्पा मारीत आपल्या घरासमोर उभ्या होत्या. एक महिला रस्त्यावरुन जात होती. त्याचवेळी आज सायंकाळी रामेश्वर कॉलनीकडून भरधाव वेगाने जाणाऱ्या कार(एम.एच.०५ ए.एस०५७४) चालकाचे कुठलेही नियंत्रण नसल्याने कारने घरासमोर उभ्या असलेल्या या महिलांना धडक देत उडविले. या धडकेत दुध घेण्यासाठी जात असलेल्या शोभा रमेश पाटील यांना गंभीर दुखापत होवू त्यांचा जागीच मृत्यू झाला.

तर त्यांच्यासोबत असलेल्या संगीता प्रकाश महाजन (वय ४८), जयश्री जगदीश राऊत (वय ३०), सुमनबाई साहेबराव पाटील (वय ६५), अर्चना पाटील (वय ४०) या जखमी झाल्या. तर दोन लहान मुलं देखील जखमी झाल्याची माहिती मिळाली. एका महिलेच्या हातात असलेल्या चिमुकल्या बाळाला देखील मार लागला. या घटनेमुळे परिसरातील लोक जमा होवून त्यांनी तात्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, या अपघातातील कारचा चालक कार चालक पवन कैलास पाटील (वय 25 रा. सप्तशृंगी कॉलनी रामेश्वर कॉलनी जळगाव) हा नवशिक्या असल्याचे समोर आले आहे. अपघात झाल्यावर त्यास पकडून नागरिकांनी जागेवरच चांगला चोप दिला. त्यानंतर त्याला घटनास्थळी आलेल्या एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. कारचा चालक रामेश्वर कॉलनी परिसरातील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली आहे याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.दरम्यान, या अपघातात महिलेच्या हातात असलेल्या चिमुकल्यासही दुखापत झाली असून सुदैवाने त्याचे प्राण वाचले आहेत. यावेळी जमावाने कार चालकाला चांगलाच चोप दिल्याने त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे समजते .

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now