⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

जळगाव शहरवासियांना पालकमंत्री पावणार कि ठाकरे गट म्हणून दुर्लक्ष करणार?

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पुन्हा एकदा मंत्री गुलाबराव पाटील यांची वर्णी लागली आहे. जळगाव जिल्ह्याला पुन्हा गुलाबराव पाटील पालकमंत्री म्हणून लाभणे हि जिल्ह्यासाठी कौतुकास्पद बाब आहे परंतु शहरासाठी ते कितपत फायदेशीर ठरेल हे येणारी वेळच सांगू शकणार आहे. गेल्या अडीच वर्षाचे पालकमंत्री आणि आताचे पालकमंत्री दोघांमध्ये मोठा फरक आहे. गेल्या वेळीचे गुलाबराव पाटील हे शिवसेनेचे मंत्री होते आणि आताचे गुलाबराव पाटील शिंदे गटाचे मंत्री आहे. जळगाव मनपाच्या महापौर जयश्री महाजन ठाकरे गटाच्या असून सत्ता शिवसेनेच्याच हाती आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे असे स्पष्ट चित्र सध्या राज्यात असून पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव शहराला पावणार कि ठाकरे गट असल्याने दुर्लक्ष करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जळगाव शहराचे नशीब नेहमीच फुटके राहिले आहे. मोजून चार-सहा मातब्बर राजकारणी जळगाव जिल्ह्यात असून त्यांचा देखील ताळमेळ बसत नाही. आजवर नेहमी जिल्ह्यातील राजकारणी एकमेकांचे पाय ओढण्यात राहिले आणि त्यामुळे शहराचा विकास रखडला. नेत्यांचे मतदार संघ विकासकामांना बहरले असले तरी जळगाव शहर राजकारणाला बळी पडले. आजची अवस्था तर अशी आहे कि जळगावकरांना शहरापेक्षा खेड्यागावातील रस्ते चांगले वाटू लागले. नागरिकांचे देखील खरेच आहे. जे दिसते तेच नागरिक मांडतात.

जळगाव शहर मनपाची गोष्ट घेतली तर गेल्या पंचवार्षिकला भाजपने भलीमोठी आश्वासनांची यादी जळगाव शहरवासियांसमोर मांडली आणि आपली सत्ता मनपावर प्रस्थापित केली. जळगाव शहर मनपा, महाराष्ट्र राज्य आणि देशात देखील भाजपची सत्ता होती. एकाच पक्षाची सत्ता असल्याने जळगाव शहराचा विकास होईल असे जळगावकरांना वाटत होते मात्र तसे काही झाले नाही. कुठे निधी मिळाला तर कुठे रखडला. निधी आणि कामांचे नियोजन रखडले तर निधी देखील परत गेला असे अनेकवेळा घडले. जळगावकर मात्र पुन्हा विकासापासून वंचितच राहिले.

अडीच वर्षापूर्वी राज्यात मोठा धमाका झाला. भाजपला विरोधात बसावे लागले तर राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसची सत्ता आली. जळगाव शहर मनपात तेव्हा भाजपची सत्ता होती. साधारणतः दीड वर्षापूर्वी जळगाव शहर मनपात अभूतपूर्व सत्तांतर झाले आणि भाजपची सत्ता उलथवून टाकत शिवसेनेने आपला भगवा फडकावला. मनपावर शिवसेनेची सत्ता आली. राज्यात देखील शिवसेनेची सत्ता होती आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. आपल्या हक्काचे मंत्री जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने शहराला मोठा फायदा होईल असे वाटत होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगाव मनपाला फायदा तर झालाच शिवाय निधी आणि काही रखडलेले प्रश्न देखील मार्गी लागले. दोन दिवसापूर्वी पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटील यांची निवड झाल्याने जळगावला पुन्हा हक्काचे मंत्री मिळाले आहे. जळगाव जिल्ह्याला गुलाबराव पाटील हे मंत्री म्हणून मिळाले असले तरी शहराला त्यांचा कितपत फायदा होणार हे तर येणारा काळच सांगेल. सध्या गुलाबराव पाटील हे शिंदे-भाजप गटाचे मंत्री असून जळगाव शहराच्या महापौर जयश्री महाजन या उद्धव ठाकरे गटाच्या आहेत. पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटील यांनी कोणताही भेदभाव न केला तर जळगावकर त्यांना कायम लक्षात ठेवतील आणि जे भाजपने करून दाखवले नाही ते गुलाबरावांनी करून दाखविले असे म्हणतील.

उलटपक्षी पालकमंत्र्यांनी रखडलेला निधी मिळवणे, जळगाव मनपाला निधी मिळवून देणे आणि प्रलंबित प्रश्न मार्गी न लावल्यास गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करायला विरोधकांना संधी मिळेल. अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या जळगाव मनपा निवडणुकीत कोण कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवेल, युती-आघाडी होईल कि नाही हे निश्चित नसले तरी जे होईल ते जळगाव शहराला मिळणाऱ्या निधीच्या मुद्द्यावर अवलंबून असेल हे निश्चित आहे.