⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

चाळीसगावात भेसळयुक्त दूधाची सर्रास विक्री

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२१ । चाळीसगावमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त दुधाची विक्री होत आहे. दुधाची भेसळ केली जात आहे. ते आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरत आहे. बिगर भेसळीचे दूध 60 ते 65 रुपये लिटर या दराने विकले जाते. मात्र भेसळयुक्त दूध 40 ते 45 रुपये लिटर दराने दिले जाते. दूध स्वस्त मिळते म्हणून जवळपास 60 ते 65 टक्के लोक हे स्वस्तातील दूध घेतात. मात्र या दुधात जीवघेणी भेसळ केलेली असते. दुधात जे पाणी टाकले जाते ते पाणी अशुद्ध असते. आणि म्हणून भेसळयुक्त व दूषित पाणी टाकलेली दूध पिल्याने लहान मुलांसह मोठ्या माणसांना देखील डायरीयाची लागण झाल्याचे दिसून येत आहे.

पावसाळ्यात भेसळयुक्त दूध पिल्याने अनेकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. चाळीसगावातील दवाखाने आधीच साथीच्या आजारांनी गच्च भरले आहेत.आणि म्हणून या सर्व प्रकाराच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाने चाळीसगावकडे लक्ष देऊन दुधात भेसळ करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी चाळीसगाव मधील नागरिकांकडून करण्यात आली आहे.