⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

मतदार संघात चमकोगिरीसाठी महापुरुषांच्या पुतळ्यांचे शुद्धीकरण का?

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । जळगाव शहर मतदार संघात विधानसभा निवडणुकीसाठी डझनभर उमेदवार गुडघ्याला बाशींग बांधून तयार असले तरी जळगाव ग्रामीणमध्ये फारशी गर्दी नाही. त्यातच नेहमीचे प्रतिस्पर्धी गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar) यांच्यात एकाला संधी मिळणार आहे. राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने आमदारकीसाठी गुलाबराव वाघ (Gulabrao Wagh) यांचे नाव पुढे येत आहे. आमदारकीच्या शर्यतीत येताच वाघ आक्रमक झाले आहेत. ना.गुलाबराव पाटील यांनी महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करताच दुसऱ्या दिवशी वाघ यांनी महापुरुषांच्या पुतळ्याचे शुद्धीकरण केले. एरव्ही वर्षभर अतिक्रमणाने घेरलेल्या आणि आजूबाजूला अवैध धंदे असताना ते हटविण्याचे धाडस दाखवायला वाघ यांना जमले नाही मात्र शुद्धीकरणाच्या नावाखाली चमकोगिरीचे शिखर मात्र त्यांनी सहज गाठले.

गुलाबराव वाघ हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते असून त्यांना आपल्या देशातील थोर महापुरुषांचे विचार काय आहेत? हे त्यांना माहित असतीलच हे गृहीत धरायला हरकत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव जरी घेतलं तरी देखील संपूर्ण देशाच उर भरून येतं. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्यामुळेच आज संपूर्ण देशामध्ये अस्पृश्यतेच निर्मूलन झाले आहे. अस्पृश्यता आणि रूढी परंपरांनी बरबटलेल्या समाजाचे खऱ्या अर्थाने विचार परिवर्तन करणाऱ्या या महामानवाला संपूर्ण देश झुकून अभिवादन करतो. त्यांनी दाखवलेल्या दिशेकडे देश वाटचाल करण्याचा प्रयत्न गेल्या ७५ वर्षापासून करत आहे. आंबेडकर हे नुसतं नाव नसून खऱ्या अर्थाने देशाच्या एकात्मतेच खरं रूप आहे. अशा वेळेस ज्या शुद्धीकरणाच्या विरोधात डॉ.आंबेडकरांनी लढा दिला, त्याच आंबेडकरांच्या पुतळ्याचे शुद्धीकरण करून गुलाबराव वाघ यांनी नक्की काय सिद्ध केलं?

राजकारणात कधीही थोर महापुरुषांना आणायचे नाही ही शिकवण खुद्द हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे. अस असताना गुलाबराव पाटील यांच्या बद्दल असलेल्या वैयक्तिक राजकीय वैरासाठी महापुरुषांच्या पुतळ्यांना मध्ये आणणे उचित होते का? छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महापुरुष आहेत ते कोणत्याही पक्षाचे, समाजाचे किंबहुना कोणत्याही जातीचे नाहीतच. हे सर्व थोर असून संपूर्ण भारताचे आहेत. संपूर्ण भारत या महापुरुषांकडे आदराने बघतो त्यांचे विचार आत्मसात करायचा प्रयत्न करतो. मात्र त्यांच्याच विचारांची पायमल्ली करून गुलाबराव वाघ यांना काय मिळाल? महापुरूषांसमोर नतमस्तक होणारा प्रत्येक व्यक्ती एक समान असतो, त्यात गद्दार, निष्ठावान असा प्रश्नच उरत नाही.
हे देखील वाचा : शिंदे सरकारमध्ये गद्दारांना त्यांची लायकी समजली : आदित्य ठाकरे

आमचे हिंदुत्व हे काही कट्टरपंथी हिंदुत्व नसून सर्व समाजाला सर्व धर्माला एकत्र घेऊन चालणारे आमचे हिंदुत्व आहे असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेहमी म्हणत असतात. त्याच उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकाने म्हणजेच गुलाबराव वाघ यांनी ज्याप्रकारे महापुरुषांच्या पुतळ्यांचे शुद्धीकरण केलं ते योग्य होते का?
गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेत बंडखोरी करून शिंदे गटात सामील झाल्यापासून शिवसेनेतला उद्धव ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग गुलाबराव वाघ यांना समर्थन देत आहे. गुलाबराव वाघ आता जणू काही ‘धरणगाव चे भावी आमदारच’ आहेत अशा प्रकारे स्वतःला लोकांपुढे नेत आहेत. गुलाबराव पाटील यांच्या बरोबर असलेल वैयक्तिक वैर जरी मान्य केलं. तरी या दोघांच्या असलेल्या राजकीय वैरामध्ये महापुरुषांना आणायची गरज होती का?

मंत्रिपद मिळाल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. खरं म्हणजे डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेमुळेच आज गुलाबराव पाटील मंत्री झाले आहेत. किंबहुना या देशात झालेला कोणीही मंत्री हा केवळ आणि केवळ आंबेडकरांनी लिहिलेल्या त्या घटनेमुळेच झाला आहे. अशा वेळी आंबेडकरांना अभिवादन करणे हा त्यांचा केवळ अधिकारच नसून हे त्यांचे कर्तव्य आहे आणि गुलाबराव पाटलांनी ते कर्तव्य बजावलं. डॉ.आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेमुळेच आज देशातला प्रत्येक नागरिक जगू शकतो त्यामुळे या देशात राहणाऱ्या प्रत्येकाने डॉ.बाबासाहेबांना अभिवादन करण हे गरजेचेच आहे.
हे देखील वाचा : मंगेश चव्हाण २०१४ ला दलाली करायचा, करोडपती कसा झाला : आ. खडसेंची जहरी टीका

गुलाबराव पाटलांना विरोध करायचा आणि चमकोगिरी करायची ह्या उद्देशाने ज्या प्रकारे गुलाबराव वाघ यांनी महापुरुषांच्या पुतळ्याचं शुद्धीकरण केलं हे कितपत योग्य आहे? आज जिल्ह्यातील संपूर्ण शिवसेना जरी गुलाबराव वाघ यांच्या केलेल्या या कृतीचे समर्थन करत असली काही नागरिकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. युवासेना प्रमुख तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे याचा जळगाव जिल्हा दौरा मोठ्या दिमाखात झाला. अशा वेळेस गुलाबराव वाघ यांनी केलेल्या कृत्याबद्दल कोणी न कोणी आदित्य ठाकरे यांना सांगितले असणारच. वाघांचे हितचिंतक काही कमी नाहीत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक नाव नसून आंबेडकर एक विचार आहे आणि आंबेडकरांच्या विचारांची प्रतारणा करण्याचं काम गुलाबराव वाघांनी केलंय आणि ह्या प्रतारणेचे ठाकरे समर्थन करणार की वाघांवर कारवाई करणार? हे कालच्या दौऱ्यानंतर पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे.